पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेत १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कोंढवा भागात रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी मोटारचालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली.
निवृत्ती बाजीराव किसवे (वय १३, रा. कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक जैद नसीर शेख (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती हा रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कोंढव्यातील भोलेनाथ चौकातून निघाला होता. त्या वेळी भरधाव मोटारीने निवृत्तीला धडक दिली. अपघातात निवृत्ती गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी मोटारचालक जैद याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
गंभीर जखमी झालेल्या निवृत्तीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. मोटारचालक जैद याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याने मद्यप्राशन केले नसल्याचे तपासणीत उघडकीस आले. जैद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दिली.दरम्यान, खराडी भागात शनिवारी डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील सहप्रवासी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर कोंढवा भागात झालेल्या अपघातात मोटारीच्या धडकेत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.