पिंपरी: दिवाळीनंतर शहरातील हवेत सुधारणा झाली असून, प्रदूषण घटल्याचा दावा करत महापालिकेने बांधकामे बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला. बांधकाम व्यावसायिकांनी काळजी घेऊन बांधकाम करावे. साहित्य झाकून ठेवावे अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.
हिवाळ्यात जमिनीवरील धूलिकण हवेत जाऊन हवा प्रदूषित होते. धूलिकणांचे प्रमाण वाढते. मागील काही दिवसांत शहरातील प्रदूषणात वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खबरदारी म्हणून विविध उपाययोजना हाती घेतल्या होत्या. मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत लक्ष्मीपूजनानंतर जोरदार फटके फोडले. फटाक्यांच्या प्रदूषणाची भर पडल्याने शहरातील वाकड, भोसरी, निगडीतील हवा गुणवता निर्देशांकात धूलिकणांचे प्रमाण ३८० च्या पलीकडे गेले. त्यामुळे हवेची गुणवत्ता अतिवाईट श्रेणीमध्ये गेली होती. दिवाळीत शहराच्या हवेची गुणवत्ता दिल्लीनंतर सर्वांत प्रदूषित गटात गणल्याचे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) सफर या संकेतस्थळाच्या माध्यमातून समोर आले.
हेही वाचा… VIDEO: अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत; लोखंडी जाळीत अडकलेल्या एक वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका
वाढत्या प्रदूषणामुळे महापालिका प्रशासनाने १९ नोव्हेंबरपर्यंत सर्व बांधकामे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता दिवाळी संपली आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारत आहे. धूलिकणांचे प्रमाण ११२ पर्यंत खाली आले आहे. त्यामुळे बांधकामे सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने शुक्रवारी घेतला. त्याबाबतचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढला. बांधकाम व्यावसायिकांनी वाळू, खडीसह इतर साहित्य झाकून ठेवावे. हिरवा कपडा झाकावा अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शहरातील हवेत सुधारणा होत आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकात धूलिकणांचे प्रमाण ३८० च्या पुढे गेले होते. ते कमी होऊन ११२ वर आले आहे. रस्त्यांची ‘रोड वॉशर’ यंत्रणा असलेल्या दोन वाहनांद्वारे साफसफाई सुरू ठेवली जाणार आहे. त्यामुळे प्रदूषणात आणखी घट होत राहील. – संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका