पुणे : राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील घेतल्या जाणाऱ्या पायाभूत चाचणीतून यंदा इयत्ता नववीला वगळण्यात आले आहे. गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीमध्ये नववीचाही समावेश होता. मात्र, यंदा नववीला का वगळण्यात आले, या बाबतचे नेमके कारण कळू शकलेले नाही.
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे की नाही, याची पडताळणी करून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) नुकतेच तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत पायाभूत चाचणी घेतली जाणार आहे. त्यात दहा माध्यमांतील विद्यार्थ्यांची प्रथम भाषा गणित, तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची चाचणी घेतली जाणार आहे.
पायाभूत चाचणी मागील इयत्तेचा अभ्यासक्रम, मुलभूत क्षमतांवर आधारित असणार आहे. तसेच ऑक्टोबर शेवटचा आठवडा ते नोव्हेंबर पहिला आठवडा या दरम्यान संकलित मूल्यमापन चाचणी १, तर एप्रिल २०२६मध्ये संकलित मूल्यमापन चाचणी २ घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पायाभूत चाचणीच्या वेळापत्रकानुसार दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ६ ऑगस्ट रोजी प्रथम भाषा, ७ ऑगस्ट रोजी गणित, ८ ऑगस्ट रोजी तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. शालेय वेळापत्रकानुसार सकाळ किंवा दुपारच्या सत्रात परीक्षेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. स्थानिक परिस्थितीनुसार काही तारखांमध्ये बदल करायचा झाल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी एससीईआरटीची पूर्वपरवानगी घेऊन बदल करावा. लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात तोंडी परीक्षा घ्यावी. विद्यार्थी संख्या जास्त असल्यास दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्यावी. चाचणीसाठीच्या प्रश्नपत्रिका एससीईआरटीकडून विद्यार्थिनिहाय १४ ते २८ जुलै या कालावधीत पुरवल्या जाणार आहेत.
गेल्या वर्षीचे पायाभूत चाचणीचे वेळापत्रक तपासले असता त्यात नववीचाही समावेश असल्याचे दिसून आले. या अनुषंगाने माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले म्हणाले, सुरुवातीला पायाभूत चाचणीमध्ये दुसरी ते आठवी या इयत्तांचाच समावेश होता. गेल्यावर्षी त्यात इयत्ता नववीचाही समावेश करण्यात आला. मात्र, यंदाच्या वेळापत्रकात इयत्ता नववीला वगळण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे ही धरसोड का करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इयत्ता नववीला पायाभूत चाचणीतून वगळण्यामुळे नववीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी काही वेगळी व्यवस्था केली जाणार आहे का, शाळांनीच त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, याबाबत शाळांना अद्याप काहीच स्पष्टता देण्यात आलेली नाही, असे एका शिक्षकाने सांगितले. तसेच एकच वर्ष नववीचा समावेश पायाभूत चाचणीमध्ये करून काय साध्य झाले, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, इयत्ता नववीला पायाभूत चाचणीतून का वगळण्यात आले, या बाबत जाणून घेण्यासाठी ‘एसससीईआरटी’शी संपर्क साधला असता प्रतिसाद देण्यात आला नाही.