पुणे शहरातील मॉडेल कॉलनी येथील जैन समाजाच्या बोर्डिंग जमीन व्यवहारप्रकरणी भाजपाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव समोर आल्यानंतर मागील काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर दररोज नवीन आरोप करीत आहेत. तर त्या सर्व घडामोडींदरम्यान चार दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग असलेल्या ठिकाणी भेट दिली आणि आपण केलेल्या मागणीनुसार निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यावेळी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी जैन बोर्डिंग जागेच्या विक्रीचा व्यवहार १ नोव्हेंबरपूर्वी रद्द करण्याचा निर्णय घ्यावा; अन्यथा आम्ही उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.

त्यानंतर अनेक घडामोडीना वेग आल्यानंतर गोखले बिल्डर्स यांनी जमीनविक्रीचा व्यवहार रद्द करण्यात यावा, अशा स्वरूपाचा मेल एचएनडी ट्रस्टींना केला आहे. जैन बोर्डिंग जमीनखरेदी व्यवहारप्रकरणी काल मुंबईत सुनावणी झाली. त्यावेळी गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीने ३० ऑक्टोबर रोजी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ३० ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

त्या सर्व घडामोडींदरम्यान जैन बोर्डिंग जमीन व्यवहारप्रकरणी आज देशभरातील जैन समाजाने एक दिवसीय उपवास करावा, असे आवाहन आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी केले होते. त्यानुसार आज जैन बोर्डिंगच्या ठिकाणी नागरिक एकत्रित येऊन एक दिवसीय उपवासाला बसले आहेत. त्यावेळी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला असता, ते म्हणाले, “आमचं आंदोलन सरकारविरोधात नसून अन्यायाविरोधात आहे.

बिल्डरने माघार घेतली आहे आणि ट्रस्टींनीदेखील व्यवहार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जे ट्रस्टी स्वतःहून ही चूक कबूल करतील, त्यांना आम्ही माफ करू; पण जर त्यांनी पुन्हा चूक केली, तर त्यांना माफ करणार नाही.” तसेच या ट्रस्टींचे मंडळ बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी करीत पुढे त्यांनी, “आमचं एकच लक्ष्य आहे आणि ते म्हणजे पूर्ण व्यवहार रद्द झाला पाहिजे. रद्द झालेल्या व्यवहाराचा कागद आमच्या हातात द्या” , अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

जैन बोर्डिंगच्या जागेपासून एक किलोमीटरच्या अंतरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत आहेत. त्या प्रश्नावर ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी जैन बोर्डिंगच्या जागेच्या ठिकाणी येऊन भेट दिली पाहिजे, ही मागणीही त्यांनी केली.