पुणे : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील १५० वर्षांचा वारसा असलेले ग्रंथालय आता नव्या इमारतीत स्थलांतरित होणार आहे. माजी विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी दिलेली देणगी आणि राज्य सरकारने दिलेल्या निधीतून सात मजली नव्या इमारतीमध्ये ग्रंथालयासह संगणक अभियांत्रिकी विभागाचा समावेश असून, या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (१४ सप्टेंबर) होणार आहे. तसेच अभियंता दिनानिमित्त सात माजी विद्यार्थ्यांना गौरवण्यात येणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, नियामक मंडळाचे सदस्य, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गिते यांनी या बाबत पत्रकार परिषदेत दिली. कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे उपस्थित होते. दुपारी दोन वाजता होणाऱ्या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
डॉ. भिरूड म्हणाले, सीओईपीच्या माजी विद्यार्थिनी गौरी शहा यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सीओईपीला सहा कोटी रुपयांची देणगी दिली. तसेच राज्य सरकारने ५१ कोटी रुपये दिले. या निधीतून नव्या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीतील तीन मजले ग्रंथालयासाठी, तर चार मजले संगणक अभियांत्रिकी विभागासाठी वापरण्यात येणार आहेत. ग्रंथालयात डिजिटल ग्रंथालयासह वाचनकक्षासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रंथालयात चार हजारांहून अधिक पुस्तके आहेत. तसेच अनेक दुर्मीळ ग्रंथ आहेत. विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ अभ्यास, वाचन करता येण्यासाठी २४ चास वाचन कक्ष सुरू ठेवण्यासा मानस असल्याचे यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेतर्फे अभियंता दिनानिमित्त सीओईपी अभिमान पुरस्कार २०२५ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. त्यात यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या १९६७च्या तुकडीच्या विद्यार्थिनी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंथा रामास्वामी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच स्थापत्य अभियांत्रिकीचे १९७१च्या तुकडीचे विद्यार्थी, बांधकाम व्यावसायिक विलास जावडेकर, स्थापत्य अभियांत्रिकीच्या १९७५च्या तुकडीचे विद्यार्थी, अमेरिकन सोसायटी ऑफ मॅकेनिकल इंजिनिअर्सचे माजी अध्यक्ष महांतेश हिरेमठ, स्थापत्य अभियांत्रिकीच्या १९७५च्या तुकडीचे विद्यार्थी, उद्योजक जयंत इनामदार, यंत्र अभियांत्रिकीच्या १९९३च्या तुकडीचे विद्यार्थी जेएनपीटीचे अध्यक्ष उमेश वाघ, यंत्र अभियांत्रिकीच्या १९९७च्या तुकडीचे विद्यार्थी, उद्योजक तुषार मेहेंदळे, इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकीचे २०००च्या तुकडीचे विद्यार्थी, सनदी अधिकारी श्रावण हर्डीकर यांना अभिमान पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याचे भरत गिते यांनी सांगितले.