पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या उड्डाणपुलाचे रखडलेले उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (१ सप्टेंबर) होणार आहे. त्यानंतर तातडीने उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यान उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. यापूर्वी सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाइम चित्रपटगृह दरम्यान राजाराम पूल चौकातील ५२० मीटर लांबीचा उड्डाणपूल आणि विठ्ठलवाडी कमान ते फन टाइम चित्रपटगृह हा २ हजार १२० मीटर लांबीचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी यापूर्वीच खुला करण्यात आला आहे.

तर, तिसऱ्या टप्प्यातील गोयल गंगा चौक ते इनामदार चौक हा १ हजार ५४० मीटर लांबीचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. या उड्डाणपुलाची किरकोळ कामे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशानसाकडून करण्यात आला होता. मात्र कामे होऊनही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जात नसल्याचा दावा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर कामे वेगाने पूर्ण करण्यात आली आणि उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उड्डाणपुलाची माहिती

एकूण लांबी : सुमारे २.५ किलोमीट

पुण्यातील सर्वांत लांब उड्डाणपूल

एकूण खर्च ११८ कोटी रुपये

कामाचा कालावधी : सप्टेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२५

उड्डाणपुलाचे प्रमुख टप्पे

प्रथम टप्पा (१५ ऑगस्ट, २०२४) : राजाराम पूल चौकातील ५२० मी. लांबीचा उड्डाणपूल (खर्च १५ कोटी).

दुसरा टप्पा (१ मे, २०२५) : विठ्ठलवाडी ते फनटाईम, २.१ किमी लांबीचा पूल (खर्च ६१ कोटी).

तिसरा टप्पा (१ सप्टेंबर, २०२५) : गोयल गंगा चौक ते इनामदार चौक, १.५४ किमी लांबीचा पूल (खर्च ४२ कोटी)

सिंहगड रस्त्यावरील प्रमुख चौक विना-अडथळा पार करण्याची सुविधा.

वाहनचालकांचा दररोज १५ ते २५ मिनिटांचा प्रवास वेळ वाचणार.

सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी, तसेच बेंगळुरू-मुंबई राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता

सिंहगड रस्ता परिसरात सकाळ-संध्याकाळ वाहतुकीचा ताण प्रचंड असतो. या परिस्थितीत ११८ कोटींचा सिंहगड रस्ता उड्डाणपूल प्रकल्प हा पुणे शहरातील एक महत्त्वाकांक्षी आणि तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने प्रवास जलदगतीने आणि सुकर होईल. माधुरी मिसाळ, नगरविकास राज्यमंत्री