लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) सरावादरम्यान गोळीबार करताना १३ वर्षीय विद्यार्थ्यांच्या डोक्यास गोळी लागून त्याचा मृत्यूस जबाबदार ठरलेल्या प्रशिक्षकास न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरी आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी सदोष मनुष्यवध प्रकरणी याबाबतचा निकाल दिला.

आमोद अनिल घाणेकर (वय २७, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) या प्रशिक्षकास शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेत पराग देवेंद्र इंगळे (वय १३) याचा मृत्यू झाला होता. सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) मुख्यालयात एक फेब्रुवारी २०१३ रोजी ही घटना घडली होती. पराग हा पाषाण येथील लॉयला शाळेचा विद्यार्थी होता. घटनेच्या दिवशी सरावादरम्यान घाणेकर मुलांना जमिनीवर झोपवून गोळीबार करण्याचे प्रशिक्षण देत होता. त्यावेळी पराग अचानक उठून उभा राहिला आणि त्याचवेळी घाणेकरच्या बंदुकीतील गोळी परागच्या डोक्याला शिरली होती.

आणखी वाचा- पुणे जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याचे पोलीस भरतीचे स्वप्न साकार!

याबाबत घाणेकर विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी या गुन्ह्‍याचा तपास करून घाणेकर विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यान या गुन्ह्यातून वगळण्यासाठी घाणेकर अर्ज केला होता. तो न्यायालयाने सप्टेंबर २०१४ मध्ये फेटाळून लावला होता. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी पाहिले. दंडाच्या रकमेतील तीन लाख रुपये परागच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी. घाणेकरने दंड भरला नाही तर त्याला अतिरिक्त एक वर्ष शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा- पुणे: भाजप नेत्यांना वेळ मिळेना आणि गदिमा नाट्यगृहाचा पडदा उघडेना!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोळी लागल्यानंतर परागवर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. तो तीन वर्षे कोमात होता. मात्र सात जानेवारी २०१६ रोजी त्याचा कमांड रुग्णालयात मृत्यू झाला होता. परागची आई तीन वर्ष रुग्णालयात होती. कोणताही पालक मुलांना शाळेत पाठवतो तेव्हा त्यांना ताब्यात घेणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी असते की, विद्यार्थ्यांचे संरक्षण करावे. मात्र या गुन्ह्यात प्रशिक्षणकाने हातात बंदूक घेतली. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला होता.