पुणे : दक्षिणेकडील राज्यांत नारळाच्या उत्पादनात २५ टक्क्यांनी घट झाल्याने यंदा गणेशोत्सवापूर्वी नारळाला उच्चांंकी ‘भाव’ मिळाला आहे. किरकोळ बाजारात नारळाची किंमत ४० ते ५० रुपये झाली आहे.
श्रावण महिन्यातील विविध सणांमुळे नारळांना मागणी वाढली आहे. गणेशोत्सवातही नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू या राज्यांत पाऊस कमी प्रमाणात झाला. त्यामुळे उत्पादनात घट झाली. तसेच नारळाच्या झाडांना मोठ्या प्रमाणात कीड लागली. त्यामुळे घाऊक बाजारात नारळाची आवक कमी प्रमाणावर होत आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे.
‘मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज दोन ते अडीच लाख नारळांची आवक होत आहे. एका पोत्यात १०० नारळ असतात. नेहमीच्या तुलनेत यंदा नारळांची आवक कमी प्रमाणावर होत आहे,’ असे मार्केट यार्डातील नारळ व्यापारी दीपक बोरा यांनी सांगितले.
‘गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात नारळांना मागणी असते. उत्सवात मंदिरात तोरण, उपवासाचे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी नारळाची मागणी वाढते. खोबरेल तेल आणि गोटा खोबऱ्याला मागणी चांगली आहे. पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी मार्केट यार्डामधून नारळाची खरेदी करतात. उत्सवाच्या कालावधीत खाद्यपदार्थ विक्रीत मोठी वाढ होते. हाॅटेल-केटरिंग व्यावसायिक, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नारळांच्या मागणीत वाढ होते,’ असे बोरा यांनी नमूद केले.
श्रावण महिना सुरू झाल्यानंतर नारळाच्या मागणीत वाढ होते. गणेशोत्सवात नारळाला उच्चांकी मागणी असते. यंदा दक्षिणकेडील राज्यांत नारळ उत्पादनात २५ टक्क्यांनी घट झाली आहे. गणेशोत्सवापूर्वीच नारळाला उच्चांकी भाव मिळाला आहे. नारळाचा भाव तेजीत राहणार आहे.- दीपक बोरा, नारळ व्यापारी, मार्केट यार्ड
नारळाचे भाव जून जुलै
नवा नारळ २००० ते २२०० २६०० ते २७००
साउथ नारळ २१०० ते २२०० २८०० ते २९००
मद्रास ४२०० ते ४७०० ४७०० ते ५२००
पालकोल २४०० ते २५०० २७५० ते २८५०
सापसोल मोठा ४२०० ते ५२०० ४५०० ते ५६००
सापसोल मध्यम २१०० ते ३००० २५०० ते ३५००
थोडक्यात महत्त्वाचे…
– दक्षिणेकडील राज्यांत कमी पावसामुळे नारळ उत्पादनात घट
– परिणामी, बाजारात नारळाची आवक कमी
– त्यातच सण-उत्सवांमुळे मागणी वाढल्याने दरांत वाढ
– किरकोळ बाजारात नारळाची किंमत ४० ते ५० रुपये