पुणे : मेट्रो स्थानकांच्या संरचनात्मक लेखापरीक्षणावरून (स्ट्रक्चरल ऑडिट) सुरू असलेला गोंधळ आणखी वाढला आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतिम अहवाल महामेट्रोकडे सादर केल्याचा दावा केला होता. आता विद्यापीठाने घूमजाव करीत भूमिका बदलली आहे. महामेट्रोच्या सुरात सूर मिसळत विद्यापीठाने याबाबत संयुक्त निवेदनही जाहीर केले आहे.
पुणे मेट्रो स्थानकांच्या उभारणीत आढळलेल्या त्रुटी पुण्यातील काही ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्या होत्या. मेट्रो स्थानकांच्या सुरक्षिततेबाबत दाखल जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात १७ एप्रिलला सुनावणी झाली. त्या वेळी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करून सात दिवसांत अहवाल सादर करण्यात येईल, असे न्यायालयाला सांगितले होते. यानुसार, विद्यापीठाकडून मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले.
हेही वाचा >>>टीका खिलाडूवृत्तीने स्वीकारणे हीच खरी लोकशाही; व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांचे मत
विद्यापीठातील प्राध्यापक बी.जी. बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली हे ऑडिट करण्यात आले. यात काही प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश होता. बिराजदार यांनी मेट्रोला स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतिम अहवाल दिल्याचे ३ मे रोजी सांगितले होते. त्या वेळी महामेट्रोने हा अहवाल मिळाला नसल्याचा दावा केला होता. दरम्यान, बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सीओईपी आणि महामेट्रो यांनी आज संयुक्त निवेदन जाहीर केले आहे. त्यात म्हटले आहे,की सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाकडून मेट्रो स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू आहे. काही तांत्रिक प्रश्न आणि निरीक्षणे असलेला पाहणी अहवाल विद्यापीठाने महामेट्रोला दिला आहे. यावर महामेट्रोकडून लवकरात लवकर प्रतिसाद दिला जाईल. यानंतर सीओईपीकडून अंतिम अहवाल महामेट्रोला सादर केला जाईल.
हेही वाचा >>>‘डीआरडीओ’ संचालकाची परदेशात पाकिस्तानी हेरांशी भेट; ‘एटीएस’च्या तपासातील माहिती
सही, शिक्क्याविना संयुक्त निवेदन
मेट्रो स्थानकांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवरून गोंधळ सुरू आहे. हा गोंधळ मिटवण्यासाठी महामेट्रो आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ यांनी संयुक्त निवेदन काढले. परंतु, या संयुक्त निवेदनावर दोन्हींच्या अधिकारी व्यक्तींची सही अथवा शिक्का नाही. केवळ पदाचा उल्लेख असून, त्यावर नावाचाही उल्लेख नाही.
महामेट्रोकडे आम्ही मेट्रो स्थानकांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा पाहणी अहवाल सादर केला आहे. यावर दोन-तीन दिवसांत महामेट्रोकडून उत्तर अपेक्षित आहे. हे उत्तर मिळाल्यानंतर प्राध्यापक बी.जी.बिराजदार पुन्हा स्थानकांची पाहणी करतील आणि त्यानंतर अंतिम अहवाल महामेट्रोला सादर केला जाईल.- डॉ.डी.एन.सोनावणे, कुलसचिव, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ