पुणे : नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी महापालिकेत सुरू करण्यात आलेला अभ्यागत कक्ष केवळ सोमवारीच सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवार आणि गुरुवार असे आठवड्यातून दोन दिवस हा कक्ष सुरू ठेवला होता. मात्र, राम यांनी यामध्ये बदल केला आहे.
महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, प्रत्येक सोमवारी हा अभ्यागत कक्ष सुरू राहणार आहे. पहिल्या सोमवारी आयुक्त, तर पुढील तीन सोमवारी अतिरिक्त आयुक्त यास उपस्थित राहतील. यापूर्वीच्या तक्रारींच्या अनुभवावरून अतिक्रमण, बांधकाम, पाणीपुरवठा आणि मिळकतकर विभागाचेच अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
दर सोमवारी दुपारी चार ते साडेपाच या वेळेत नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी पावले उचलण्यात येतील. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हा कक्ष डॉ. भोसले यांनी सुरू केला होता. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून बदल करण्याचा निर्णय आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे.