सात वर्ष सुनावणी; ३७ साक्षीदारांची साक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्याचा निकाल उद्या Nayana Pujari case (८ मे) लागणार आहे. गेली सात वर्षे या खटल्याची सुनावणी शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू आहे.

संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात सुरू आहे. सरकार तसेच बचाव पक्षाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर काम पाहात आहेत. सरकार पक्षाकडून ३७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. बचाव पक्षाकडून अ‍ॅड. बी. ए. अलुर, रणजीत ढोमसे पाटील, अंकुशराजे जाधव काम पाहात आहेत. बचाव पक्षाकडून १३ साक्षीदार तपासण्यात आले आहेत.

संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी (वय २८, रा. अशोकाआगम, दत्तनगर, कात्रज) या ८ ऑक्टोबर २००९ रोजी कामावरून घरी निघाल्या होत्या. त्यावेळी हडपसर येथे सोडण्याचा बहाणा करून मोटारचालक आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचे अपहरण केले. त्यांच्यावर अत्याचार करून खून करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह खेड तालुक्यातील जरेवाडी फाटा येथे टाकून देण्यात आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती.

पोलिसांकडून या गुन्ह्य़ाचा तपास करून आरोपी योगेश अशोक  राऊत (वय २४), राजेश पांडुरंग चौधरी (वय २३, दोघे रा. गोळेगाव, ता. खेड, जि. पुणे) महेश बाळासाहेब ठाकूर (वय २४, रा. सोळू, ता. खेड, जि. पुणे), विश्वास हिंदूराव कदम (वय २६, रा. दिघी, आळंदी रस्ता, मूळ रा. भुरकवाडी, ता. खटाव, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली होती.

या खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर आरोपी योगेश राऊत हा ससून रुग्णालयातून पसार झाला होता. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, पोलीस नाईक संतोष जगताप यांच्या पथकाने त्याला शिर्डी येथे पकडले होते. दरम्यान, राऊत याला पसार झाल्याप्रकरणी न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात आरोपी राजेश चौधरी याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती. त्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जबाब नोंदविण्यात आला होता. बचाव पक्षाकडून चौधरी याला माफीचा साक्षीदार करण्यास उच्च न्यायालयात हरकत घेण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चौधरी याला माफीचा साक्षीदार करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Computer engineer nayana pujari murder case result today
First published on: 08-05-2017 at 04:04 IST