लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी संगणक अभियंत्याची एक कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ४५ वर्षीय तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार धायरी भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. ३० जून रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठविली. संगणक अभियंत्याने लिंक उघडून पाहिली. त्यानंतर त्यांचा शेअर बाजारविषयक माहिती देणाऱ्या समुहात समावेश करण्यात आला. समुहाचा प्रमुख रजत चोप्रा नावाच्या चोरट्याने त्यांना शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक योजनांची माहीती दिली. त्यानंतर त्यांना एक उपयोजन (ॲपस्टॉक) मोबाइलवर उघडण्यास सांगितले. त्यामाध्यमातून त्यांनी वेळोवेळी एक कोटी १५ लाख ४४ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही.
आणखी वाचा-शहरबात : पुणे विमानतळाचं करायचं काय?
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत. गेल्या वर्षभरापासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन पोलिसांनी वेळोवेळी केली. आवाहनाकडे काणाडोळा करून नागरिक चोरट्यांच्या आमिषाला बळी पडत असल्याचे दिसून आले आहे.