चांदणी चौकातील पुलावर छिद्रे पाडण्याचे (ड्रिलिंग) काम करण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच हा पूल वाहतुकीसाठी अचानक बंद करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय), जिल्हाधिकारी कार्यालय आणि वाहतूक पोलीस प्रशासन यांपैकी एकाही यंत्रणेने पूल बंद ठेवण्याबाबत पूर्वसूचना दिली नाही. या प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. तर, अचानक पूल बंद केल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन मंगळवारी सकाळी कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी झाली होती. तसेच कामासाठी चाललेल्या नोकरदारांना त्रास सहन करावा लागला.

चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर वाहतूक कशी वळविली जाणार, याचा आराखडा महामार्ग प्राधिकरणाने मंगळवारी अधिकृतपणे जाहीर केला. मात्र, पूल पाडताना पुणे-सातारा महामार्गावरील सर्व वाहतूक काही वेळ बंद ठेवावी लागणार आहे. या महामार्गावर कात्रज ते देहूरोड या दरम्यान दिवसभरात जवळपास दीड ते पावणेदोन लाख वाहने ये-जा करतात. त्यामुळे पूल पाडताना महामार्ग बराच काळाकरिता बंद ठेवल्यास वाहतुकीत कसा बदल केला जाणार, याचे नियोजन अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

हेही वाचा : पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्याच्या प्रकियेला सुरुवात

दरम्यान, चांदणी चौकातील कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी एनएचएआयने चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचे नियोजन केले आहे. दिल्ली येथील कंपनीकडून हे काम केले जात आहे. सध्या पूल पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी केली जात आहे. सोमवारपासून जुन्या पुलाच्या खांबांना छिद्रे पाडून जिलेटिनच्या कांड्या लावण्यात येत आहेत. मंगळवारी देखील हेच काम सुरू होते. या कामासाठी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
चांदणी चौकातील जुना पूल नेमका कधी पाडणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

हेही वाचा : ‘काबरेपेनेम’ प्रतिजैविक रुग्णांसाठी निरुपयोगी ; भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे संशोधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूल पाडणाऱ्या कंपनीने आठ दिवसांचा कालावधी मागितला आहे. याबाबत चर्चा सुरू आहे. समांतर पातळीवर पुलाचा इतर भाग तोडण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद केली असून नव्याने बांधलेला पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. – संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआय, पुणे विभाग