पुणे : जन्मजात हृदयरोग असलेल्या, मुदतपूर्व जन्मलेल्या व कमी वजनाच्या बाळावर डॉक्टरंनी यशस्वीरित्या बलून एओर्टोप्लास्टी प्रक्रिया केली. या बाळाच्या हृदयातून शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या डाव्या कप्प्यातील प्रमुख रक्तवाहिनीमध्ये अडथळा होता. डॉक्टरांनी बलून एओर्टोप्लास्टी प्रक्रियेद्वारे या बाळावर उपचार केले. त्यानंतर अतिदक्षता विभागातील २० दिवसांच्या देखभालीनंतर आता बाळ सुखरूप घरी गेले आहे.
नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरमध्ये नजीकच्या एका रुग्णालयातून १ हजार ५०० ग्रॅम वजनाच्या व मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाला जन्मानंतर दोन तासांतच आणण्यात आले. आईच्या पोटात असताना या बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता असल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्रसूती साडेसात महिन्यांत झाली होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बाळाची परिस्थिती अस्थिर होती. त्याला श्वसनाचा त्रास होत होता. प्राणवायू आणि रक्तदाबाची पातळी कमी झाली होती. त्याच्या तपासणीत कोॲर्कटेशन ऑफ एर्ओटा म्हणजेच हृदयातून शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या डाव्या कप्प्यातील प्रमुख रक्तवाहिनीमध्ये अडथळा असल्याचे निदान झाले, अशी माहिती शिशुतज्ज्ञ डॉ. अनिल खामकर यांनी दिली.
पेटंट डक्टस आर्टेरिओसिस (पीडीए) १० दिवसांनी अरूंद झाल्याने बाळाला श्वसनाचा त्रास सुरू झाला आणि हृदयाचे कार्य बंद पडू लागले. बाळाला वाचविण्यासाठी अरूंद झालेल्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये बलून डायलेटेशन म्हणजेच फुगा टाकून फुगविणे ही प्रक्रिया करून रक्तप्रवाह पूर्ववत करणे हा एकमेव मार्ग होता. त्यामुळे बाळावर ही प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये रक्तवाहिनीत अरूंद झालेल्या भागात एक फुगा टाकण्यात येतो. नंतर तो फुगा हळूहळू फुगवत अरूंद झालेली वाहिनी मोठी करण्यात येते, असे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रभातकुमार यांनी सांगितले. या प्रक्रियेमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. नीलेश वसमतकर आणि त्यांच्या पथकाने सहकार्य केले.
कोॲर्कटेशन ऑफ एर्ओटा म्हणजे काय?
कोॲर्कटेशन ऑफ एर्ओटा ही स्थिती असलेले लहान बाळ काही दिवस स्थिर असते. कारण पेटंट डक्टस आर्टेरिओससच्याद्वारे रक्ताभिसरणाला पर्यायी मार्ग मिळतो. डक्टस ही मुख्य रक्तवाहिनी आणि फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांना जोडणारी गर्भाची वाहिनी असते. डक्टसमुळे जन्माच्या आधी ही वाहिनी रक्ताला फुफ्फुसापासून दूर नेते. प्रत्येक बाळ हे डक्टस आर्टेरिओसससह जन्मते. जन्मानंतर याची गरज नसल्यामुळे पहिल्या काही दिवसांत अरूंद होऊन बंद होते. मात्र, मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा असल्यास बाळाला जन्मानंतर काही दिवसांतच हा त्रास सुरू होतो.
