पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) १८ वर्षांच्या काळात भारतीय प्रशासकीय सेवेतील २१ अधिकाऱ्यांनी ‘पीएमपी’च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार सांभाळला आहे. परंतु, आर. एन. जोशी (आयएएस) वगळता कोणत्याच अधिकाऱ्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नसल्याने अधिकारी बदलीची परंपरा कधी खंडित होणार, असा प्रश्न प्रवासी संघटनांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ‘बदल्यांमागे ठेकेदारांशी गुंतलेले आर्थिक हितसंबंध कारणीभूत आहेत,’ असा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उपनगरांच्या हद्दीपर्यंत जाणाऱ्या ‘पीएमपी’ची स्थापना २००७ मध्ये झाली. ‘पीएमपी’च्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदावर आतापर्यंत २१ अधिकाऱ्यांनी सेवा बजावली. मात्र, ‘पीएमपी’चे चक्र फिरण्यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू होत नाहीत, तोच वर्षभरात राज्य सरकारकडून बदली केली जात असल्याची परंपरा सुरू असल्याचे दिसून आले आहे.
पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांची नुकतीच बदली झाली असून, २२ वे संचालक म्हणून पंकज देवरे यांची नियुक्ती करण्यात आली. वर्ष पूर्ण होत नाही, तोच बदली झाल्याने त्याही मुदतपूर्व बदलीच्या परंपरेेला अपवाद ठरल्या नाहीत.
‘गेल्या सात वर्षांत नयना गुंडे, डॉ. राजेंद्र जगताप, कुणाल खेमनर, लक्ष्मीनारायण मिश्रा, ओमप्रकाश बकोरिया, सचिंद्र प्रताप सिंग, डॉ. संजय कोलते आदी अधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यांचा सेवाकाळ पूर्ण व्हायच्या आत त्यांना बदलण्यात आले,’ असे जोशी यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
परिणाम काय?
‘‘पीएमपी’च्या चाकाला गती देण्यासाठी आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी आखणी केली. मात्र, बदली झाल्याने प्रकल्प अर्धवट राहिले आहेत. नवीन अधिकारी आले, की धोरणे बदण्यात आली आहेत. निर्णय प्रक्रियेत विरोधाभास दिसून आला आहे. प्रवासी सेवा सुधारण्याऐवजी पीएमपीचे चाक अडखळतच आहे. समस्यांचा डोंगर वाढला असून, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. प्रवाशांची नाराजी वाढली असून, सेवेवर परिणाम होत आहे,’ असे निरीक्षण ‘पीएमपी’ प्रवासी मंचाचे संजय शितोळे यांनी नोंदवले.
आर्थिक हितसंबंधांचा आरोप
गेल्या सात वर्षांत आठ अधिकारी बदलल्याने ‘पीएमपी’ सेवेचा खेळखंडोबा झाला असल्याची टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे ठेकेदारांशी गुंतलेले आर्थिक हितसंबंध कारणीभूत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. ‘दीपा मुधोळ-मुंडे यांनी प्रशासकीय आणि व्यवस्थापनाची घडी बसविण्याची सुरुवात केली होती.
प्रवाशांशी संवाद साधून ‘पीएमपी’सेवा गतिमान करण्यास सुरुवात केली होती. वर्ष पूर्ण होऊन अवघे चार दिवस होत नाहीत, तोच मुंडे यांची बदली करण्यात आली. त्यामुळे भाजप हा खेळ कोणासाठी खेळत आहे,’ असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला. तसेच अधिकाऱ्यांच्या बदलीसत्रामुळे ‘पीएमपी’च्या कारभाराची घडी व्यवस्थित बसू दिली जात नसल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.