ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच या प्रकरणातील तपासाची माहिती घेतली. यावेळी धंगेकरांनी ड्रग्ज प्रकरणात आर्थिक व्यवहार करणाऱ्या एका आरोपीचा उल्लेख करत त्याला अटक करण्याची मागणी केली. हा आरोपीच ललित पाटील, ससूनचे डीन आणि पोलिसांशी आर्थिक व्यवहार करत होता, असंही त्यांनी म्हटलं. ते सोमवारी (२० नोव्हेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते. रवींद्र धंगेकर म्हणाले, "ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलला अटक झाली. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. ससूनच्या डीनवर कारवाई करताना त्यांना पदमुक्त केलं. मात्र, खरं म्हणजे ती खोटी कारवाई आहे. न्यायालयानेच ससूनच्या डीनला पदमुक्त केलं होतं. शासनाची कारवाई म्हणजे कावळा बसायचा आणि फांदी तुटायचा वेळ एक झाला असं आहे." "शेवते नावाचा मध्यस्थाकडून ललित पाटील, डीन आणि पोलिसांशी व्यवहार" "ड्रग्ज प्रकरणात सरकारने जनतेच्या तोंडाला पानं पुसली आहेत. या प्रकरणात शेवते नावाचा मध्यस्थ होता. तो ललित पाटील, डीन आणि पोलिसांशी व्यवहार करत होता. त्या शेवतेला अटक करावी अशी मागणी आम्ही केली आहे. शेवतेमार्फतच डीन आणि पोलिसांना पैसे जात होते. त्या शेवतेला पैसे आणून कोण देत होतं याचा तपास करावा, अशी मागणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे केली आहे," अशी माहिती रविंद्र धंगेकरांनी दिली. "…म्हणून ससूनच्या डीनला पदमुक्त करण्यात आलं" रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले, "शेवते ससूनचा कर्मचारी होता. तोच या प्रकरणात आर्थिक व्यवहार करत होता. ही माहिती मला प्रशासनातूनच मिळत आहे. त्या शेवतेला अटक केल्याशिवाय या प्रकरणाचा पूर्ण तपास होणार नाही, असं मी पोलिसांना सांगितलं आहे.शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाई करायची असेल, तर त्याला शासनाची परवानगी लागते. शासनाची कारवाई झाली आहे. त्यात डीन दोषी सापडले आणि त्यामुळे त्यांना पदमुक्त करण्यात आलं आहे." हेही वाचा : ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केली? VIP उपचारासाठी मंत्र्याचे फोन आले? ससूनचे अधिष्ठाता म्हणाले… "एका चोराने दुसऱ्या चोराला पैसे दिल्यानंतर ते वसूल करण्याचे अधिकार…" "या प्रकरणात देवकाते म्हणून डॉक्टरांवरही कारवाई झाली. मात्र, गुन्हेगाराने एखाद्याला पैसे दिले तर ते वसूल करण्याचं काम पोलिसांचं आहे. त्याला शासनाची परवानगी लागत नाही. कारण एका चोराने दुसऱ्या चोराला पैसे दिल्यानंतर ते पैसे वसूल करण्याचे अधिकार पोलिसांना आहे. तो पोलिसांच्या तपासाचा भाग आहे," असंही धंगेकरांनी नमूद केलं.