|| अविनाश कवठेकर
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसने पर्वती विधानसभा मतदार संघ घेतला असला, तरी या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारापुढे आव्हान निर्माण करू शकणार का, हाच मुख्य मुद्दा उपस्थित होणार आहे. भाजपचे भक्कम संघटन, महापालिका निवडणुकीपासून वाढलेली ताकद आणि मतदार संघातील बदलेलेली परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदार संघात ताकदीने प्रयत्न करावे लागतील. त्यातच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारापुढेच आव्हान निर्माण झाल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
काँग्रेसचा एके काळचा बालेकिल्ला ते भारतीय जनता पक्षाचा मतदार संघ अशी पर्वती मतदार संघाची ओळख झाली आहे. अगदी महापालिका निवडणुकीतही भाजपचेच शत प्रतिशत नगरसेवक येथून विजयी झाले. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी झाली नाही. त्यामुळे सर्व पक्ष स्वतंत्र लढले. भाजप आणि शिवसेना अशीच थेट लढत इथे झाली. त्यामध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी शिवसेनेचे उमेदवार सचिन तावरे यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या आणि काँग्रेसचा चौथ्या स्थानी राहिला. ही राजकीय परिस्थिती असताना आघाडीमध्ये कोणत्या पक्षाची ताकद जास्त यावरून वाद सुरू झाला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदार संघ खेचून आणला. राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदार संघावर दावा करताना जुन्या निवडणूक निकालांचा आधार घेतला आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहिली, तर भाजप उमेदवाराचे तगडे आव्हान या मतदार संघात असणार आहे, ही वस्तुस्थिती आहे.
पर्वती विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांची संख्या २७ असून त्यामध्ये भाजपचे २३ नगरसेवक आहेत. या भागात भाजपची संघटनात्मक बांधणी भक्कम आहे. महापालिका निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर आले. विधानसभा निवडणुकीतही भाजपला सातत्याने यश मिळाले आहे. महापालिका निवडणुकीत या मतदार संघातून मोठय़ा संख्येने पक्षाचे नगरसेवक विजयी झाले. विद्यमान आमदार, महापालिकेतील सभागृहनेता आणि स्थायी समिती अध्यक्षही याच मतदार संघातील आहेत. पर्वती मतदार संघ कोणाचा यावरून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस कडून दावे-प्रतिदावे केले जात असले, तरी भाजपचा हा मतदार संघ असल्याचे कायम स्पष्ट झाले आहे.
तत्पूर्वी सन २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला येथे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार १५ हजारांच्या फरकाने पराभूत झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला अधिक मते मिळाली होती. मात्र भक्कम संघटन असलेल्या आणि आघाडीतच बंडखोरी झाल्यामुळे राजकीय परिस्थितीही बदलली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढविलेले सचिन तावरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर लढत तिरंगी होईल की दुरंगी हे समजेल. पण राष्ट्रवादी काँग्रेसपुढील आव्हान मात्र कायम राहील.