पुणे : “कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली आहे. त्यानुसार कसबा पेठ विधानसभेचा आज रात्री काँग्रेस पक्षाचा उमेदवार जाहीर होईल. तर, चिंचवडच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते भूमिका मांडतील”, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, आम्ही उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरिता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर हेमंत रासने यांनी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची केसरीवाडा येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी शैलेश टिळक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उघड उघड नाराजी देखील व्यक्त केली. या सर्व घडामोडीदरम्यान आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आमदार संग्राम जगताप, शहराध्यक्ष अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसोबत बैठक घेण्यात आली.

हेही वाचा – पुणे : नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना, नाट्यसंस्थांना अनुदान मिळण्याचा मार्ग खुला

हेही वाचा – पुणे : वाकड ते नऱ्हे मार्गावर ध्वनी प्रतिबंधात्मक भिंती उभारा, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, आजपर्यंत एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यावर ती निवडणूक बिनविरोध होण्याची प्रथा होती. मात्र, कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती भाजपाच्या नेत्याकडून करण्यात आली होती. याबाबत कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली. आपण एकत्रित बसून यावर सविस्तर चर्चा करूया, मात्र माझा फोन होताच पुढील अर्ध्या तासात टिळक कुटुंबीयांऐवजी दुसर्‍या उमेदवाराला भाजपकडून संधी देण्यात आली. त्यातून भाजपाची नीती दिसून येते. मुक्ता टिळक यांनी आजारी असताना देखील विधिमंडळात येऊन मतदानाचा हक्क बजावला होता. यातून भाजपाने कशा प्रकारे टिळक कुटुंबाला न्याय दिला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.