पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या मार्गिकेसाठी खांबांच्या उभारणीनंतर दोन खांबांना जोडणाऱ्या सिमेंटच्या ढाचाच्या उभारणीला सुरूवात करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या व्हायाडक्ट सेगमेंटची उभारणी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क येथील मेगापोलिस सर्कल येथे शुक्रवारी करण्यात आली. हे सिमेंटचे ढाचे यशदा, ताथवडे येथील प्रकल्पाच्या देखभाल-दुरूस्ती आगारात (कास्टिंग यार्ड) तयार केले जातात. या प्रकल्पामध्ये संपूर्ण मार्गासाठी अंदाजे ८३८९ ढाचे लागणार आहेत. हा प्रकल्प जलदगतीने हाती घेतला असून मार्च २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, आनंद ऋषीजी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पीएमआरडीएने एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. सद्य:स्थितीत प्रस्तावित उड्डाणपुलाच्या आरेखनात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रस्त्याच्या मध्यभागी कमीतकमी खांब उभारून वाहतुकीला कमीतकमी अडथळा होईल, अशा पद्धतीने काम करण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने चालू वर्षी २२ फेब्रुवारीच्या परिपत्रकाद्वारे उड्डाणपूल बांधकामासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मान्यता दिली आहे.

पीएमआरडीएच्या अधीक्षक अभियंता रिनाज पठाण, भरतकुमार बाविस्कर, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक पै, पीआयटीसीएमआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर या वेळी उपस्थित होते.

प्रकल्पाचा आढावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो मार्गिका माण, हिंजवडी येथून सुरू होऊन वाकड, बालेवाडी, बाणेर, आनंद ऋषीजी चौकातून शिवाजीनगर येथे जाऊन जिल्हा व सत्र न्यायालयापर्यंत आहे. ही उन्नत मार्गिका असून २३.२०३ कि.मीची आहे. मार्गिकेत २३ स्थानके आहेत. हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी या तत्त्वावर संकल्पना करा, बांधा, अर्थ पुरवठा करा, चालवा आणि हस्तांतर करा (डीबीएफओटी) प्रारूपांतर्गत हाती घेण्यात आला आहे. ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स जीएमबीएच यांच्या संयुक्त संस्थेला प्रदान करण्यात आला आहे. प्रकल्प हाती घेण्यासाठी विशेष उद्देश वाहन ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ची स्थापना करण्यात आली आहे. प्रकल्पाची किंमत (भूसंपादन, सेवा वाहिनी स्थलांतर करणे इ. खर्चासह) ८३१३ कोटी एवढी आहे.