पुणे-मुंबई द्रुतगती रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होऊन प्रवाशांना ताटकळत बसावे लागण्याचे प्रकार सुरू असतानाच, बुधवारी सकाळी जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर लोकांना वाहतुकीची कोंडी सहन करावी लागली. या रस्त्यावर कामशेत खिंडीतील तीव्र उतारावर एका कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्याच्या वाहनाने एका ट्रकला धडक दिली. त्यात तो उलटल्याने मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक तब्बल चार तास विस्कळीत झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले आहेत. पोलिसांनी काही तासांनंतर तेथील वाहतूक सुरळीत केली.
या अपघाताबाबत कामशेत ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी एक कंटेनर पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाला होता. त्याच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. हा प्रकार कामशेत खिंडीत घटला. तेथे तीव्र उतार आहे. या उतावावरून तो भरधाव वेगाने पुढे गेला आणि रस्तादुभाजक ओलांडून पलीकडच्या रस्त्याच्या दिशेला पोहोचला. तेथे एक मालवाहू ट्रक पुण्याच्या दिशेने घाट चढत होता. त्याला या कंटेनरची ठोकर बसली. त्यामुळे कंटेनरचा चालक दशरथ कुमार प्रजापती आणि ट्रकचा चालक सुरेश दिलचंद मेहता हे किरकोळ जखमी झाले. मात्र, अपघातानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या मध्येच होती. ती जड असल्याने लगेच दूर करता आली नाहीत. यामुळे पुण्याच्या दिशेला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. सकाळी साडेआठच्या सुमारास अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला करण्यात पोलिसांना यश आले. तोवर वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्त्यावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
गेल्या दोन महिन्यात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अनेकदा अपघातानंतर वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यात प्रवाशांना तीन तासांपासून ते सात तासांपर्यंत रखडावे लागले होते. द्रुतगती मार्गावर असे प्रकार होत असल्यापाठोपाठ आता जुन्या रस्त्यावरही असा प्रकार घडला.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2015 रोजी प्रकाशित
कामशेत खिंडीत भल्या पहाटे कंटेनर, ट्रक यांचा विचित्र अपघात
पुणे-मुंबई द्रुतगती रस्त्यावर बुधवारी सकाळी जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर लोकांना वाहतुकीची कोंडी सहन करावी लागली. कामशेत खिंडीत भल्या पहाटे कंटेनर, ट्रक यांचा विचित्र अपघात झाला.
First published on: 12-02-2015 at 03:03 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Container truck accident near kamshet