लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महापालिका आयुक्तांशी चर्चा न करता थेट मान्यतेसाठी ठेवण्यात आलेले आणि वादग्रस्त सल्लागार मंडळावरून वादात सापडलेले महापालिकेचे सांस्कृतिक धोरण अखेर दप्तरी दाखल करण्यात आले. या धोरणासाठी वेगळा विभाग स्थापन करून त्यांच्यामार्फत नवीन धोरण तयार केले जाणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सांस्कृतिक धोरण दप्तरी दाखल करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरासाठी महापालिकेने सांस्कृतिक धोरण तयार केले होते. पुण्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जतन करणे, संवर्धन करणे त्यात भर घालणे अशी उद्दिष्ट असलेले धोरण १ मार्चला मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले होते.

शहरातील सांस्कृतिक उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी बैठका, सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केले जाईल. पुण्यातील स्थानिक कलाकार, सांस्कृतिक केंद्रे, शैक्षणिक संस्थांचे सहकार्य घेणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, सांस्कृतिक स्थळे, प्रदर्शन स्थळे, कला प्रदर्शन, मैफलीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पर्यटकांना आकर्षित करून स्थानिक व्यावसायिकांचा आर्थिक विकास घडविण्याचा उद्देश या धोरणामध्ये नमूद करण्यात आला होता.

गेल्या आठवड्यात हे धोरण स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्यात आले. मात्र यावर सांस्कृतिक विभागाने कोणतीही चर्चा न केल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत हा प्रस्ताव पुढे ढकलला होता. दरम्यान या धोरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या नावाचा उल्लेख होता. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणारी व्यक्ती करणार महापालिकेचे सांस्कृतिक धोरण, असे आरोप शहरातील काही संघटनांनी केले होते. महाराजांबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांना महापालिकेच्या पायघड्या अशी वृत्त देखील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध करून याविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळेच महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी हे धोरण फेटाळून लावल्याची चर्चा महापालिकेत रंगत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, शहराचे सांस्कृतिक धोरण तयार करण्यासाठी महापालिकेने कोणतीही समिती नेमलेली नव्हती. धोरणाचा मसुदा यासाठी नेमलेल्या खासगी एजन्सीने तयार केला होता. त्यामुळे त्याला मान्यता दिलेली नाही. सांस्कृतिक धोरण तयार करण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार केला जाईल. लवकरच त्या बाबत निर्णय घेतला जाईल, असे महापालिका आयुक्त भोसले यांनी सांगितले.