पुणे : मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंग होस्टेलच्या वादग्रस्त जागेबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव आल्याने वाद निर्माण झाला आहे. या जागेवरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता या जागेच्या विकसनासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता १८ मजल्यांच्या इमारतींचे नकाशे मंजूर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जैन बोर्डिंग होस्टेलच्या जागेत बांधकाम परवानगी देताना अनेक नियमांकडे दुर्लक्ष करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाखाली बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी १८ मजले इमारतींच्या बांधकाम नकाशे मंजुर केले असल्याचा आरोप शहर काँग्रेसकडून करण्यात आला. या प्रकरणात झालेल्या अनियमित कारभाराची चौकशी करुन संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेत ही मागणी केली.
या जमिनीवर बांधकामांचे नकाशे मंजुर करताना येथील झाडे, विहिरी, मंदिर याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अग्नीशमन विभाग तसेच वृक्ष प्राधिकरण समितीचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी हे नकाशे मंजुर केले. पर्यावरण दाखला मिळविण्यासाठी नकाशात झाडे, विहिरी तसेच म्हाडा आरक्षण दाखविणे गरजेचे होते. मात्र याकडेही दुर्लक्ष केल्याची तक्रार करण्यात आली आहे. महापालिकेच्या बांधकाम विभाग, विधी विभाग, अग्नीशमन विभाग तसेच दक्षता विभागातील अधिकाऱ्यांनी यामध्ये जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष संशयास्पद असून या संबधित सर्वांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जैन बोर्डिंग होस्टेलच्या वादग्रस्त जागेबाबत आज २८ ऑक्टोबरला धर्मदाय आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये काय निकाल धर्मदाय आयुक्तांकडून दिला जाणार याकडे जैन समाजाबरोबरच राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे. मॉडेल कॉलनी येथील साडेतीन एकर जैन बोर्डिंग होस्टेलची जागा एका बांधकाम व्यावसायिकाला विकसनासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मर्जीतील बांधकाम व्यावसायिकाला ही जागा देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
जैन समाजाला अंधारात ठेवत हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करत जैन मुनींनी या मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. हिराचंद नेमचंद दोषी यांच्या योगदानातून १९५८ साली मॉडेल कॉलनी येथे या वसतिगृहाची स्थापना करण्यात आली होती. ट्रस्टकडून विकासकामाच्या नावाखाली या जागेचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, समाजातील अनेक सदस्यांनी या योजनेला ठाम विरोध दर्शवला होता. काही महिन्यांपूर्वी जागा विक्रीसंबंधी व्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे.
