सततच्या र्निबधामुळे पिंपरी त सर्वच क्षेत्रातून नाराजीचा सूर

पिंपरी: करोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर िपपरी-चिंचवड शहरात देण्यात आलेल्या सवलती काढून घेत पुन्हा जुने निर्बंध लागू केल्यानंतर सर्वच क्षेत्रातून विशेषत: हातावर पोट असणाऱ्या वर्गातून नाराजीचा आणि निषेधाचा सूर व्यक्त होत आहे. आता कुठे मोकळा श्वास घेऊन व्यवसायाची घडी बसवण्याचे प्रयत्न सुरू झाले असतानाच पुन्हा-पुन्हा निर्बंध लागू केले जात असल्याने जगायचे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

करोना संसर्गदर घटल्याने शहरातील निर्बंध कमी करण्यात आले होते. मात्र, करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूच्या (डेल्टा प्लस) प्रादुर्भावाचा धोका आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने सोमवारपासून जुने निर्बंध नव्याने लागू केले. त्यानुसार, अत्यावश्यक सेवांमध्ये नमूद केलेल्या सेवा, दुकाने आठवडयातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहतील. मात्र, शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद राहणार आहेत. याप्रकारे लागू केलेल्या र्निबधामुळे सर्वच क्षेत्रातून नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.

पिंपरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी म्हणाले, की पुन्हा निर्बंध वाढवणे व्यापाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानांपुढे पथारीवाल्यांचे अतिक्रमण आहे. मात्र, चार वाजताच पालिकेची पथके व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी तत्पर असतात. यासंदर्भात सर्वाशी चर्चा  करून आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. उद्योजक संजय जैन म्हणाले की, दीड वर्षांपासून करोनामुळे उद्योजकांची परिस्थिती हलाखीची आहे. खऱ्या अर्थाने ११ वाजता व्यवसाय सुरू होतो. चार वाजता सर्वकाही बंद करावे लागते. या कालावधीत काहीच साध्य होत नाही. असेच र्निबधांचे धोरण सुरू राहिल्यास उद्योजक खचून जातील. ते पुन्हा उभारी घेऊ शकणार नाहीत.

केशकर्तनचालक विशाल अहिरे यांनी सांगितले, की सकाळी घाईची वेळ असल्याने संध्याकाळी ग्राहकांचे प्रमाण जास्त असते. चारनंतरच्या र्निबधामुळे आमचे मोठे नुकसान होत आहे.

कामगारांना बससेवा देणे बंधनकारक

अत्यावश्यक उद्योग वगळता इतर उत्पादन क्षेत्र ५० टक्के क्षमतेने सुरू राहील, यासाठी पालिकेने परवानगी दिली. मात्र, कामगारांसाठी वाहतूक व्यवस्था संबंधित उद्योगांना करावी लागेल, असे बंधन घालण्यात आले आहे. कामगारांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे नाराजीचा सूर आहे. आम्हाला बससेवा उपलब्ध करून देणे शक्य नाही, याकडे उद्योजकांनी लक्ष वेधले आहे.

अपुरी यंत्रणा

महापालिका हद्दीतील सर्व दुकाने, कंपनी, बाजार, बांधकाम स्थळ, उपाहारगृहे, बार, फूड कोर्ट आदी ठिकाणी काम करणारे कामगार व इतरांची दर १५ दिवसांनी करोना  प्रतिजन चाचणी करणे बंधनकारक असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. प्रत्यक्षात महापालिकेकडे तितकी सक्षम यंत्रणा आहे का? तसेच,  करोना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मागणी करूनही त्यांची करोना चाचणी केली जात नाही, असे सांगण्यात आले.