लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेसह (आयसर पुणे) पुण्यातील संशोधन संस्थांनी करोना काळात मोठे काम केले. त्यामुळे प्रचंड प्रमाणात विदा उपलब्ध झाला आहे. मात्र, या विदाचे विश्लेषण करणे आव्हानात्मक आहे. त्यासाठी विदा शास्त्रज्ञांची आवश्यकता आहे, असे मत आयसर पुणेचे माजी संचालक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत उदगावकर यांनी मांडले.

आयसरच्या संचालक पदाचा भार डॉ. सुनील भागवत यांनी नुकताच स्वीकारला. त्या अनुषंगाने झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. उदगावकर बोलत होते. करोना काळात आयसर पुणेने सिरो सर्वेक्षणासह करोना चाचण्या, कृत्रिम श्वासोच्छ्वास प्रणाली अशा वेगवेगळ्या पद्धतीने काम केले. या पार्श्वभूमीवर विषाणू समजून घेण्याबाबत काय प्रगती झाली याबाबत विचारलेल्या प्रश्नावर डॉ. उदगावकर म्हणाले, की करोना संबंधीचे संशोधन अजूनही सुरू आहे. करोना विषाणू समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, पुण्यातील संशोधन संस्थांनी केलेल्या कामाचा विदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचे विश्लेषण करणे कठीण आहे. कारण त्यासाठी विदा शास्त्रज्ञांची गरज आहे. काही जीवशास्त्रज्ञांना विदा विश्लेषणाचे ज्ञान आहे. मात्र त्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे करोनाचा विषाणू समजून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या विदाचे विश्लेषण करणे गरजेचे आहे.

आणखी वाचा- पुणे : हवेली कृषि उत्पन्न बाजर समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्क्रांतीचा सिद्धान्त शिकवणे गरजेचे

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) अलीकडेच अभ्यासक्रमातून डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त वगळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. या संदर्भात विचारणा केली असता डॉ. उदगावकर म्हणाले, ‘‘उत्क्रांती ही वस्तुस्थिती आहे. काही लोकांना उत्क्रांती झाल्याचे वाटत नाही. कारण त्याबाबत अनेक गैरसमज आहेत. मात्र उत्क्रांतीबाबतची शास्त्रीय माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे जीवशास्त्र समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्क्रांती शिकवणे गरजेचे आहे.’’