करोनाकाळात किरकोळ वादांत वाढ; केवळ पुण्यात पत्नीविरोधात दीड हजार तक्रारी

पुणे : करोनाच्या संसर्गात अनेक जण घरातून काम करत आहेत. घरांमध्ये किरकोळ कारणावरून झालेले वाद विकोपाला जात असून कौटुंबिक कलहाची झळ पुरुषांनाही बसत आहे. पत्नीकडून पतीला मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळाचे प्रकार वाढत असून केवळ पुण्यात गेल्या दीड वर्षात एक हजार ५३५ पुरुषांनी पोलिसात तक्रारी केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे पोलिसांच्या ‘भरोसा कक्षा’कडे दाखल झालेल्या तक्रार अर्जातून ही बाब समोर आली. करोनाकाळापासून कौटुंबिक कलहातून एकूण तीन हजार तक्रारी दाखल झाल्या. त्यात महिलांच्या आपल्या पतीविरोधातील तक्रारींची संख्या एक हजार ५४० इतकी आहे. म्हणजेच पुरुषांनाही महिलांइतकेच छळाला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले.

या तक्रार अर्जांपैकी दोन हजार ३९४ अर्ज निकाली काढण्यात आले. तसेच दाम्पत्यातील वाद सामोपचाराने मिटवण्यात आले आहेत. करोनाच्या संसर्गात दाम्पत्यांमधील वाद वाढीस लागले आहेत. पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षाकडून समुपदेशन करण्यात येते. तसेच एखाद्या प्रकरणात पोलीस ठाण्यांचीही मदत घेण्यात येत आहे.

कारणे काय?

करोना संसर्गकाळात घरातून काम करण्याच्या निमित्ताने पती आणि पत्नी या दोघांचा सहवास अधिक वाढला असला, तरी दाम्पत्यांमध्ये फुटकळ गोष्टींवरून वाद आणि भांडणेही सर्वाधिक होऊ लागली आहेत. या वादांचा परिणाम दोघांकडून एकमेकांचा छळ करण्यात झाल्याचे समोर आले. या दीड वर्षातच पुरुषांकडून आपल्या पत्नीविरोधात तक्रारीचे प्रमाण वाढले आहे.

आकड्यांच्या भाषेत..

गेल्या वर्षी पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षाकडे एक हजार २८३ पुरुषांनी कौटुंबिक कलहाच्या तक्रारी दिल्या होत्या. महिलांकडून ७९१ तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी मे अखेरीपर्यंत २५२ पुरुषांनी तसेच ७४९ महिलांनी तक्रार अर्ज दाखल केले आहेत.

भरोसा कक्षाकडे येणाऱ्या पुरुषांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. पत्नी नांदायला येत नाही किंवा किरकोळ वादातून पत्नी त्रास देत असल्याच्या तक्रार अर्जांचे प्रमाण जास्त आहे. बऱ्याचदा दाम्पत्यातील वाद कुटुंबात सोडविले जात नाहीत. पोलिसांकडे एखादा वाद आल्यास दाम्पत्यामधील वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. – सुजाता शानमे, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा कक्ष, पुणे पोलीस 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus work form home men in family disputes akp
First published on: 10-06-2021 at 01:34 IST