करोनाचा प्रादुर्भाव राज्यात झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही शहरं रुग्ण संख्येत आघाडीवर आहेत. पुण्यात आज दिवसभरात 122 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर आता पुणे शहरातील करोना बाधितांची संख्या 1 हजार 339 इतकी झाली आहे. तसेच करोनामुळे आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून आज अखेर करोनाने 79 जणांचा बळी घेतला आहे. 14 दिवसानंतर टेस्ट निगेटिव्ह आलेल्या 27 रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 203 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे विभागात करोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत असून आज अखेर 1 हजार 563 इतकी रुग्ण संख्या झाली आहे. तर विभागात आज अखेर करोना बाधित असलेल्या एकुण 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यावेळी डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले की, करोना विषाणूंचे पुणे जिल्हयात 1 हजार 423 रुग्ण असून 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सातारा जिल्हयात 35 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोलापूर जिल्हयात 65 बाधीत रुग्ण आहेत. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.त्याच बरोबर सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 11 बाधीत रुग्ण आढळले आहेत. तर या दरम्यान 243 रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात गेल्या २४ तासात करोनाचे १५९४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या २९ हजार ९७४ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ९३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात करोनामुळे ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. आत्तापर्यंत देशभरात ७ हजार २७ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २२ हजार १० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.