बदनामीकारक मजकूर लिहिल्याप्रकरणी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.आनंद यादव आणि प्रकाशक सुनील मेहता यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर यांनी कायम ठेवली आहे. यापूर्वी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी यादव आणि मेहता यांना दहा हजारांचा दंड किंवा एक महिन्यांची कैद अशी शिक्षा सुनावली होती.
डॉ.आनंद यादव यांनी ‘लोकसखा ज्ञानेश्वर’  आणि ‘ संतसूर्य तुकाराम’ या पुस्तकांतून बदनामीकारक मजकूर लिहिला असा आरोप करण्यात आला होता. संत तुकाराम महाराजांचे वंशज जयसिंग विश्वनाथ मोरे यांनी एप्रिल २००९ मध्ये डॉ. यादव, स्वाती यादव आणि प्रकाशक सुनील मेहता यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला होता. त्या वेळी, हे लेखन संशोधन करुन केलेले आहे. तसेच वास्तववादी चरित्रात्मक कादंबरीचे लेखन आहे, असे डॉ. यादव यांनी न्यायालयात सांगितले होते. हे लेखन आक्षेपार्ह असल्याचे मान्य करत न्यायालयाने डॉ. यादव आणि प्रकाशक मेहता यांना दोषी ठरवून प्रत्येकी दहा हजारांचा दंड आणि तो न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली होती. तर स्वाती यादव यांची निदरेष मुक्तता करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयावर जिल्हा सत्र न्यायालयात अपील करण्यात आले होते. न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला आहे.