पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात यंदा दिवाळीत हवा प्रदूषण कमी झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नोंदविण्यात आली आहे. दिवाळी सुट्यांमुळे बंद असलेली बांधकामे, रस्त्यांवरील वाहनांची कमी झालेली संख्या आणि पाऊस यामुळे प्रदूषणात घट झाल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, पुणे परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १९ ऑक्टोबरला सरासरी १६२ एवढा होता. त्यात वाकडमधील भूमकर चौकात सर्वाधिक ३०० नोंद करण्यात आली. ही हवेची अतिखराब पातळी मानली जाते. त्या खालोखाल पुण्यातील लोहगाव येथील म्हाडा कॉलनीत हवा गुणवत्ता निर्देशांक २४४ वर नोंदविण्यात आला होता.

त्यानंतर पाषाणमधील पंचवटी १२१, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ११६, निगडी १०८ आणि हडपसर ८८ अशी हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली होती. त्यामुळे पुण्यातील हवेची गुणवत्ता समाधानकारक ते अतिखराब श्रेणीत होती.

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे हवा प्रदूषणात आणखी वाढ होण्याची शक्यता होती. परंतु दिवाळी सुट्यांमुळे शहरातील मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांची बांधकामे बंद राहिली. या प्रकल्पातून निर्माण होणारी धूळ मोठ्या प्रमाणात प्रदूषणास कारणीभूत ठरते. त्याचमुळे वाकड परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने खराब पातळीवर असतो. बांधकामे बंद असल्याने धूळ कमी होऊन प्रदूषणात घट झाली. याचबरोबर दिवाळीतील सलग सुट्यांमुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्याही कमी झाली. पावसामुळे हवा प्रदूषण कमी होण्यास मदत झाली.

यामुळे पुण्यात दिवाळीच्या काळात हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक ते मध्यम या पातळीवर नोंदवण्यात आला. दिवाळीत २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा दिसून आली. लक्ष्मीपूजनादिवशी (ता. २१) हवा गुणवत्ता निर्देशांक १२९, दिवाळी पाडव्यादिवशी (ता. २२) हवा गुणवत्ता निर्देशांक ११६ आणि भाऊबीजेदिवशी (ता. २३) हवा गुणवत्ता निर्देशांक ८१ नोंदवण्यात आला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत हवा प्रदूषण कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामागे प्रामुख्याने दिवाळीच्या काळात पडलेला पाऊस कारणीभूत ठरला आहे. मात्र, दिवाळीच्या काळातील फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी झाले अथवा नाही हे शहरातील फटाकेविक्रीची आकडेवारी समोर आल्यानंतर ठोसपणे सांगता येईल. – शर्मिला देवी, परिसर

शिवाजीनगर भागात मेट्रो आणि उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सातत्याने येथील हवेची पातळी खराब नोंदवली जाते. दिवाळीच्या कालावधीत या भागातील हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या नोंदीत विसंगती आढळून येत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या भागातील हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या योग्य नोंदी घेतल्या जाणे अपेक्षित आहे. – श्वेता वेर्णेकर, परिसर

हवा गुणवत्ता निर्देशांक – हवेची गुणवत्ता – त्रास

० ते ५० – चांगली – हवेचा कोणताही वाईट परिणाम आरोग्यावर नाही.

५१ ते १०० समाधानकारक – आधीपासून श्वसनविकार असलेल्या रुग्णांना किरकोळ त्रास.

१०१ ते २०० – मध्यम – फुफ्फुस, दमा, हृदयविकार असलेल्या रुग्णांना श्वसनास त्रास.

२०१ ते ३०० – खराब – दीर्घ काळ या हवेच्या संपर्कात राहिल्यास निरोगी नागरिकांना श्वसनास त्रास.