मंगला चित्रपटगृहाजवळ झालेल्या गुंडाच्या खून प्रकरणातील १७ आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली. कर्नाटक, पुणे, सोलापूर, लातूर, कोल्हापूर परिसरात ही कारवाई करण्यात आली. नितीन मोहन म्हस्के (वय २५, रा. ताडीवाला रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सागर उर्फ यल्ल्या इराप्पा कोळनट्टी (वय ३५), सुशील अच्युतराव सूर्यवंशी (वय २७), शशांक उर्फ ऋषभ संतोष बेंगळे (वय २१), गुडागपप्पा फकीरप्पा भागराई (वय २८), मल्लेश उर्फ मल्ल्या शिवराज कोळी (वय २०), किशोर संभाजी पात्रे (वय २०), साहिल मनोहर कांबळे (वय २१), गणेश शिवाजी चौधरी (वय २४), रोहित बालाजी बंडगर (वय २०, सर्व रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा >>> पुणे: ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून व्यावसायिकाची ५३ हजारांची लूट
वैमनस्यातून मंगला चित्रपटगृहासमोर १५ ऑगस्ट रोजी म्हस्के याच्यावर कोयता, तलवारीने वार करुन खून करण्यात आला होता. खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर कोळनट्टी पसार झाला होता. त्यांच्या मागावर पोलिसांची पथके होती. पुणे शहरासह लातूर, कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटक परिसरातून पसार आरोपींना अटक करण्यात आली. पाच आरोपी कर्नाटकातील रायचूरमधील दुर्गम भागात लपले होते. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि पथकाने आरोपींना ताब्यात घेतले, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.