पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत १३ लाख २८ हजारांचा ६४ किलो गांजा जप्त करण्यात आला. ओदिशा आणि धुळ्यातून पुणे शहरात गांजा विक्रीसाठी पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. पप्पू चक्रधर देवरी (वय ३२, रा. कलंड, रसलपूर, जि. जसपूर, ओदिशा), चंदन सुभाष कुंवर (वय १९, रा. तरोल, सेनापती काॅलनी, जि. कटक, ओदिशा), तसेच राकेश रुपसिंग पावरा (वय २५, रा. शिरपूर, जि. धुळे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी गस्त घालत होते. त्या वेळी देवरी आणि कुंवर हे ओदिशातून गांजा विक्रीस घेऊन आल्याची माहिती मिळाली. पुणे स्टेशन परिसरात सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या पिश‌वीची तपासणी करण्यात आली. पिशवीत गांजा आढळून आला. पोलिसांनी पिशवीतून सहा लाख २४ हजार रुपयांचा ३० किलो गांजा जप्त केला. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात धुळ्याहून एक जण गांजा विक्रीस घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून पावराला पकडले. त्याच्याकडून सात चार हजार रुपयांचा ३४ किलो गांजा जप्त करण्यात आला. अमली पदार्थ तस्करी प्रकरणी देवरी आणि कुंवर यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात, तसेच पावरा याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकातील (दोन) पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, रवींद्र रोकडे, मयूर सूर्यवंशी, चेतन गायकवाड, सय्यद साहिल शेख, उदय राक्षे, अझिम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, नीलम पाटील यांनी ही कामगिरी केली.