तळवडे भागातील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला असलेली अंतरा दास मूळची पश्चिम बंगालमधील. गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास काम संपल्यानंतर ती तळवडे आयटी पार्कमधून घरी निघाली होती. आयटी पार्कपासून काही अंतरावर मारेकऱ्याने तिला गाठले. तिच्यावर चाकूने वार करून मारेकरी पसार झाला. अंधारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंतराला एका दुचाकीस्वाराने पाहिले आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच अंतरा मरण पावली होती. संगणक अभियंता तरुणीच्या खुनाचा तपास ग्रामीण पोलिसांनी सुरू केला. संशयावरून बंगळुरुतील एका संगणक अभियंता तरुणाला पोलिसांनी पकडले. तो तरुण पूर्वी अंतराबरोबर काम करत होता. त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यात पोलिसांना अपयश आले. वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. आता अंतराचा मारेकरी कोण..? हा प्रश्न पोलिसांपुढे उभा आहे आणि पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे..
तेवीस वर्षीय अंतरा मूळची कोलकात्यातील. बंगळुरुतील आयटी कंपनीत काम करत असलेल्या अंतराला वर्षभरापूर्वी तळवडे आयटी पार्कमधील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरी मिळाली. तेथील नोकरी सोडण्यामागे सहकारी संतोष कुमार याचा त्रास देखील कारणीभूत होता. संतोष तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे तिने बंगळुरु सोडण्याचा निर्णय घेतला होता. पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या तळेवडे आयटी पार्कमध्ये नोकरी मिळाल्यानंतर अंतराने पिंपरी शहर परिसरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तेथील एको सदनिकेत ती पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. तळेवडे आयटी पार्कचा भाग हा हिंजवडी आयटी पार्कएवढा गजबजलेला नाही. ती २३ डिसेंबर २०१६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कंपनीतून घरी निघाली होती. तळेवडे आयटी पार्कमधील मुख्य चौकातून रिक्षाने ती घरी जाणार होती. काही अंतरावर दबा धरून बसलेल्या मारेकऱ्याने अंधारात चाकूने अंतरावर हल्ला चढवला. चाकूने तिला भोसकले. चाकूने भोसकल्यामुळे तिच्या शरीरारातून मोठय़ा प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि अंधारात कोसळली. अंधारात मारेकरी पसार झाला. काही वेळाने तेथून निघालेल्या एका दुचाकीस्वाराने अंधारात तरुणी पडल्याचे पाहिले. त्यामुळे त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. दुचाकीचा प्रकाशझोत अंधाऱ्या जागेच्या दिशेने नेला. क्षणभर काय करावे, हे दुचाकीस्वाराला सुचले नाही. त्याने प्रसंगावधान राखून या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि तरुणीला पिंपरीतील रुग्णालयात दाखल केले.
हा भाग पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या सीमेवर येतो. त्यामुळे हद्दीचा प्रश्न आला होता. ग्रामीण पोलिसांच्या देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात अंतराच्या बॅगेत सापडलेल्या ओळखपत्रावरून ती संगणक अभियंता असल्याचे लक्षात आले. संगणक अभियंता तरुणीचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला. तिच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली. खुनामागचा उद्देश देखील पोलिसांना कळला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अंतराच्या कंपनीतील सहकाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. तिच्या कुटुंबीय आणि निकटवर्तीयांकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा अंतरा वर्षभरापूर्वी बंगळुरुतील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला असल्याचे समजले. पोलिसांचे एक पथक तातडीने बंगळुरुला रवाना करण्यात आले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार संतोष कुमार हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयावरून त्याला ताब्यात घेतले. संशयावरून त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या तपासात ज्या दिवशी अंतराचा खून झाला, त्या दिवशी संतोष कुमार बंगळुरुतील कंपनीत काम करत होता. त्याच्या मोबाइलची तांत्रिक पडताळणी करण्यात आली. तेव्हा तो बंगळुरुत असल्याचे तांत्रिक तपासात उघड झाले. दरम्यान, संतोष कुमार याच्याविरुद्ध ठोस पुरावे सादर करणे तसेच त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात पोलिसांना अपयश आले. खून झाल्यानंतर नव्वद दिवसांच्या कालावधीत दोषारोपपत्र सादर न केल्याने संतोष कुमारला शिवाजीनगर न्यायालयाकडून महिनाभरापूर्वी जामीन मंजूर करण्यात आला. आता प्रश्न अंतराचा मारेकरी कोण? ग्रामीण पोलिसांकडून अंतराच्या मारेकऱ्याचा पुन्हा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. चोरीच्या उद्देशाने तिचा खून झाल्याचा संशय आहे. तळवडे भागातील तांत्रिक तपासातून काही माहिती मिळाली नाही. अंतराच्या मारेक ऱ्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. चार महिन्यांनंतर खुनाचा उद्देश स्पष्ट होऊ शकला नाही. पोलिसांचा तपास चाचपडत सुरू आहे. अंतरावर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याला कोणी पाहिले नाही. दोन महिन्यांपूर्वी दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिला पोलिसांपुढे आल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पोलिसांकडून मारेकऱ्याचा माग काढण्यात येत आहे.