पिंपरी : बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे केलेल्या ७१ लाखांच्या फसवणूक प्रकरणाचा छडा लावत सायबर पोलिसांनी चार दिवसांत धाराशिव, लातूर व जयपूर असा चार हजार किलोमीटरचा प्रवास करीत चार आरोपींना अटक केली. अटक केलेल्यांपैकी दोघे चीन, कंबोडिया व दुबईतील व्यक्तींशी संपर्कात असल्याचे समोर आले आहे.
अलफहाद आरिफ मोमीन (वय २७, रा. मिल्ली कॉलनी, धाराशिव), अजय पाटील ऊर्फ शिवप्रसाद मलिकार्जुन खुदासे (वय ३९, रा. लातूर), सूर्या ऊर्फ राहुलसिंग निर्मलसिंग कर्णावत (रा. झुझुनू, राजस्थान) आणि प्रेमशंकर बलदेव बैरागी (रा. भिलवाडा, राजस्थान) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा नंबर समूहात समावेश करून बनावट ॲपद्वारे गुंतवणुकीचे आमिष दाखवून ७१ लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना बँकेच्या एका खात्यावर ५० लाखांचे व्यवहार झाल्याचे आढळून आले. हे खाते धाराशिव येथील मोमीनच्या नावे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने हे खाते खुदासेच्या सांगण्यानुसार उघडल्याचे सांगितले. खुदासे यालाही लातूर येथून अटक करण्यात आली.
खुदासे याने हे खाते कर्णावत यास दिल्याचे समोर आले. त्यानंतर जयपूर येथे पोलीस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने बैरागी याच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे उघड केले. दोघांनाही जयपूर येथून अटक करण्यात आली. खुदासे विविध लोकांना संपर्क साधून बँक खाती उघडून घेत असे. तपासात कर्णावत व बैरागी हे चीन, कंबोडिया व दुबईतील व्यक्तींशी संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यातील बँक खात्यावर दोन दिवसांत तीन कोटी २५ लाखांचे व्यवहार झाल्याचेही निष्पन्न झाले आहे.