पुणे : शहरात सायबर चोरट्यांकडून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. दररोज फसवणुकीचे किमान तीन ते चार गुन्हे दाखल होत असून, सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची एक कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यापाऱ्याची सायबर चोरट्यांनी २३ लाख ४३ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६९ वर्षीय व्यापारी हे शुक्रवार पेठेत राहायला आहेत. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर गुंतवणूकविषयक संदेश पाठविला होता. चोरट्यांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याच्य आमिषाने व्यापाऱ्याची २३ लाख ४३ हजारांची फसवणूक केली. गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करत आहेत.

शेअर बाजारात गुंत‌वणुकीच्या आमिषाने वारजे-एनडीए रस्त्यावरील एका तरुणीची सायबर चोरट्यांनी आठ लाख १८ हजारांची फसवणूक केली. याबाबत तरुणीने वारजे पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश बडाख तपास करत आहेत. अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी विमाननगर भागातील एकाची ३८ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

कात्रजमधील आंबेगाव भागात राहणाऱ्या एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाकडून (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून चोरट्यांनी सहा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्नेहल अडसुळे तपास करत आहेत.

घरातून ऑनलाइन कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची २१ लाख ५२ हजारांची फसवणूक केली. याबाबत एका तरुणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाला जाळ्यात ओढले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत.

 ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने लोहगाव परिसरातील एका तरुणीची चोरट्यांनी पाच लाख १४ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने कोंढवा भागातील एका तरुणाची ६५ हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची नऊ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली होती. बँक खाते अद्ययावत न केल्यास खाते बंद पडेल, अशी बतावणी करून चोरट्यांनी त्यांची फसवणूक केली. त्यांच्या खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने खात्यातून नऊ लाख रुपये लांबविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करत आहेत.