पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सायबर पोलीस ठाणे, तसेच कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाेणी काळभोर भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८८ लाख ३४ हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ४७ वर्षीय तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लोणी काळभोर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर फेब्रुवारी महिन्यात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते.
रकम गुंतविल्यानंतर त्यांना सुरुवातीला परतावा देण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी रकम गुंतविली. रकम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही, तसेच परतावाही देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक निकम तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २२ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चाेरट्यांविरुद्ध फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.
पिंपरी महापालिकेत नोकरीच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक
सुनेला पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एका ज्येष्ठाची १४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुभाष महाजन (वय ६५, रा. फुरसुंगी, सासवड-हडपसर रस्ता), अभिजीत महाजन (वय ३१, रा. मिरज, सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महाज यांच्याशी २०२३ मध्ये ज्येष्ठ नागरिकाची एका परिचितामार्फत ओळख झाली होती.
महाजन यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या सुनेला पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाकडून आरोपींनी वेळोवेळी १४ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर नोकरी न लावल्याने त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.