scorecardresearch

राज्यातील धरणे तुडुंब; एकूण ७५ टक्के पाणी, साठा गतवर्षीपेक्षा १९ टक्क्यांनी अधिक

जोरदार पावसामुळे सध्या राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच राज्यातील धरणांमध्ये एकूण ७५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

राज्यातील धरणे तुडुंब; एकूण ७५ टक्के पाणी, साठा गतवर्षीपेक्षा १९ टक्क्यांनी अधिक
राज्याची जलचिंता दूर

पावलस मुगुटमल

पुणे : जोरदार पावसामुळे सध्या राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच राज्यातील धरणांमध्ये एकूण ७५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा धरणांमध्ये तब्बल १९ टक्के अधिक पाणी आहे.

पावसाच्या पहिल्या महिन्यात जूनमध्ये राज्यात पावसाने दडी मारली होती. संपूर्ण महिन्यात तुरळक ठिकाणीच पाऊस झाला होता. त्यामुळे पाण्याबाबत तीव्र संकटाची स्थिती निर्माण झाली होती. जूनच्या अखेपर्यंत राज्यातील धरणांमध्ये एकूण केवळ २० टक्क्यांच्या आसपास पाणी होते. या काळात विविध ठिकाणी पाणीकपात करण्यात आली. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात मात्र जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने काही दिवसांतच चित्र पालटले. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात काही भागांत अतिवृष्टीही झाली. जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ाच्या अखेपर्यंत सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जुलैअखेरीस राज्यातील पाणीसाठय़ात तब्बल ४० ते ४५ टक्क्यांची भर पडून पाणीसाठा ६६ टक्क्यांपर्यंत पोहोचला.

पश्चिम महाराष्ट्रात अनेक धरणांतून सध्या विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोकण आणि पुणे विभागात सध्या सर्वाधिक पाणीसाठा जमा आहे. पुणे विभागात दहा दिवसांपूर्वीच ६५ टक्के पाणीसाठा होता. त्यात एकदमच वाढ होऊन तो सध्या ७८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

जलभान..

सर्वाधिक पाणी कोकण विभागातील धरणांमध्ये ८८ टक्के इतका आहे. मराठवाडय़ात यंदा पाणीसाठय़ाची स्थिती समाधानकारक असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत या विभागात दुप्पट पाणी जमा झाले आहे. राज्यातील पाऊस सरासरीच्या पुढे ३० टक्क्यांनी अधिक आहे.

जोरधारांमुळे..

ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून पुन्हा राज्यात पावसाने जोर धरला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत राज्यात सर्वत्र पाऊस होतो आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. त्याचा परिणाम म्हणून १ ऑगस्टपासून ११ ऑगस्टपर्यंत राज्यातील धरणांमध्ये ९ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला असून, सध्या तो ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

पावसाची स्थिती.. राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाचा जोर कमी होत असला, तरी दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात मात्र पुढील दोन-तीन दिवस कमी अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक भागांत पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या