पुणे : सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी ‘मनशक्ती आणि तणावमुक्ती’ या विषयावर भाष्य केले. सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार या वेळी उपस्थित होत्या.

‘रोज न चुकता व्यायाम करा, हास्यक्लब मध्ये जा, स्वतःवर प्रेम करा, आनंदी राहा. शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, भौतिक अश्या सुखांचा पाया, निरोगी काया असते. आपले शरीर निरोगी असणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे. आपल्या मनाला वय नसते, मन हे चिरतरुण असते. त्यासाठी कायम सकारात्मक विचार करायला हवा,’ असा सल्ला डॉ. दत्ता कोहिनकर यांनी तणावमुक्त जगण्यासाठी काय करायला हवे हे सांगताना दिला.

रोज झोपण्याआधी आणि झोपेतून उठल्यावर १० मिनिटे हे कराच…

‘आपण ज्या प्रकारचा विचार करतो, जी चलचित्रे पाहतो आणि जी वाक्ये बोलतो, ज्या प्रकारच्या मानसिकतेमध्ये कायम राहत असतो, त्याच प्रकारची परिस्थिती, माणसे आणि वस्तूही आपल्याकडे आकर्षित होत असतात. आपण जे आहोत तेच आपल्याकडे आकर्षित करतो. त्यामुळे कायम सकारात्मक विचार करायला हवा,’ असे सांगून डॉ. कोहिनकर यांनी स्वसंवाद, अंतर्मन आणि बाह्यमन याबद्दल माहिती दिली, ध्यानाचे महत्व अधोरेखित केले.

‘रोज झोपण्याआधी १० मिनिटे आणि झोपेतून उठल्यावर १० मिनिटे सकारात्मक गोष्टींचा विचार करा, आपल्याला जी सुखे अनुभवायची आहेत ती आपल्याला मिळाली आहेत, असा अनुभव मनातून घ्या. बाहेरच्या जगातील हजारो युद्धे जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचे एक युद्ध जिंका म्हणजे शांततेत जगता येईल,’असेही डॉ. कोहिनकर यांनी सांगितले.

आजचं जीवन थोडं गुंतागुंतीचं झालं आहे. पूर्वी कुटुंबात दहा माणसं असायची, आता फक्त दोन-चारच असतात. त्यामुळेच आजकालची मुलं आजी-आजोबांबरोबर वेळ घालवायला किंवा त्यांच्याशी बोलायला फारसे इच्छुक नसतात. त्यांना त्यांच्या सहवासात राहणं विशेषसं वाटत नाही. अशा वेळी त्यांना हे समजवायला हवं की आपण ज्यांच्या अंगा-खांद्यावर खेळत मोठे झालो, चालायला, खायला, जगायला शिकलो त्यांना विसरू नये. – संजीवनी मुजुमदार, मानद संचालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक