पुणे : राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या महात्मा जोतिबा फुले वाड्याचे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेऊन हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या. अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांच्यासह महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पवार यांनी या प्रकल्पाच्या कामांची माहिती घेतली.
फुले स्मारकाचे विस्तारीकरण करण्यासाठी या भागात असलेल्या काही मिळकती महापालिकेला ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. या मिळकती नक्की किती आहे, याचे सर्वेक्षण महापालिकेने केले होते. तसेच, या मालमत्ता ताब्यात घेताना संबधित जागामालक, भाडेकरूंना नुकसानभरपाई महापालिकेला द्यावी लागणार आहे. याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासनाने दिली. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पवार यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
फुले स्मारकाचे विस्तारीकरण करताना किती भूसंपादनाची आवश्यकता आहे, याचे सर्वेक्षण महापालिकेने जवळपास पूर्ण केले आहे. ‘या भूसंपादनाच्या कामासाठी जागामालकांना व भाडेकरूंना किती नुकसानभरपाई द्यायची, याबाबतचे धोरण सध्या निश्चित केले जात आहे,’ अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर घेण्यात आलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या कामाचा आढावाही घेतला. या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी विशेष उपायुक्तांची निक्क्ती महापालिकेकडून करण्यात आली आहे.
महापालिकेच्या वतीने सध्या कामे सुरू असलेल्या फुले राष्ट्रीय स्मारकासह लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या कामाचादेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेऊन पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या. साळवे यांच्या स्मारकाचे ४० टक्के काम मार्गी लागले आहे. उर्वरित कामे पुढील काही दिवसांत पूर्ण होतील. – पृथ्वीराज बी. पी, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.