पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (११ ऑक्टोबर) खडकवासला विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. पहाटेपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात त्यांनी वारजे, आहिरेगाव, धायरी आणि नांदेड सिटी परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. पुणे नगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते.

अजित पवार यांनी वारजेतील चौधरी चौकापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा, आणि नागरिकांच्या तक्रारी यासंदर्भात त्यांनी माहिती घेतली. त्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी, विकास कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

 ‘शिवणे येथील पुलाची उंची वाढवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धायरी आणि नांदेड सिटी परिसरात विकासकामांचा आढावा घेतला. वारजे-शिवणे पुलाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर शिवणे पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याचे आदेश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

वारजेनंतर अजित पवार शिवणे नांदेड सिटी पुलाची पाहणी केली. त्यानंतर धायरीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘धायरी डिपी रोड’ आणि काञज चौकातील उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला.

 ‘…आणि नागरिकांसमोर हात जोडले

विकास कामांच्या पाहणीसाठी अजित पवार आहिरेगाव परिसरात पोहचले. त्यांच्यासमोर स्थानिक नागरिकांनी विविध समस्यांवर तक्रारींचा पाढा वाचला. अजित पवार संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देत होते. दरम्यान, स्थानिकांनी त्यांना एका मंदिरात येण्याचा आग्रह केला. त्यावेळी पहाटेपासून दौऱ्यावर असलेले अजित पवार नागरिकांवरच संतापले. ‘मी पहाटे पाच वाजता उठतो. एक तर मला देव-देव करायला लावा किंवा विकासकामे करायला सांगा,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

‘अधिकाऱ्यांना झापले’

खडकवासला परिसरातील अहिरे गावात अजित पवार विकास कामांची पाहणी करत होते. नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देत होते. रिंग रोड आणि रस्त्यांच्या समस्यांबाबत चर्चा सुरू असताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) एक अधिकारी तिथे वेळेवर उपस्थित नव्हते. त्यावर ‘वसईकर कुठे जाऊन बसता हो तुम्ही,’ असे म्हणत सर्वांसमोर अधिकाऱ्याला झापले. दोन मिनिटे उशीर का झाल्याची विचारणा करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्याची कानउघडणी केली.