scorecardresearch

दिल्लीचा बेपत्ता इंजिनिअर लोणावळ्याजवळील जंगलात मृतावस्थेत सापडला; मागील चार दिवसांपासून सुरु होता शोध

लोणावळ्यात बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाचा शोध घेणाऱ्यास कुटुंबाने १ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

Lonawala Missing youngster Farhan Shaha

लोणावळ्यातील घनदाट जंगलात बेपत्ता झालेल्या दिल्लीच्या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. फरहान शहा असं मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे. रस्ता शोधत असताना ३०० ते ४०० फुटांवरून दरीत कोसळला असल्याचं प्रथमदर्शी लोणावळा शहर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या चार दिवसांपासून फरहानचा पोलीस, शिवदुर्ग रेस्क्यू, कुरवंडे गावचे ग्रामस्थ शोध घेत होते. फरहान हा मूळ दिल्लीचा राहणारा आहे. त्याचा शोध घेणाऱ्यास कुटुंबाने १ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

मंगळवारी (२४ मे) अखेर आयएनएस शिवाजी येथील जवानांना दरीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर एनडीआरएफचं (NDRF) पथक दरीत उतरलं. त्यावेळी तो मृतदेह फरहानचा असल्याचं निष्पन्न झालं, अशी माहिती लोणावळा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डुबल यांनी दिली. फरहान शहा हा रोबोट कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता.

शुक्रवारी तो पुण्यात आला. तिथून तो लोणावळा परिसरात फिरण्यासाठी गेला. नागफणी पॉईंट येथे तो एकटाच गेला. परंतु, रस्ता चुकल्याने तो परत येऊ शकला नाही. त्याने याबाबत भाऊ, आई, वडिलांना फोन करून माहिती दिली होती. कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली आणि बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. लोणावळा शहर पोलीस त्याचा शोध घेत होते. 

फरहानचा मोबाईल बंद येत असल्याने शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. शिवदुर्ग रेस्क्यू टीम, पोलिसांचं पथक, डॉग स्कॉड, ड्रोन, कुरवंडे गावचे ग्रामस्थ, खोपोली रेस्क्यू टीम हे सर्व त्याचा शोध घेत होते. आज NDRF चं पथक देखील त्याच्या शोधासाठी दाखल झाल होतं. घनदाट जंगलात मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेणाऱ्यास एक लाखांच बक्षीस जाहीर केलं होतं.

हेही वाचा : लोणावळय़ातील टायगर पॉइंटवर सायंकाळी सातनंतर पर्यटकांना ‘नो एन्ट्री’

दुर्दैवाने आज त्याचा मृतदेह आढळला आहे. रस्ता मिळेल या आशेने फरहान धबधब्याच्या दिशेने खाली येत होता. तेव्हा, तो ३०० ते ४०० फुटांवरून खाली कोसळला. यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डुबल यांनी दिली. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dead body of a youngster from delhi found in lonavala forest kjp pbs

ताज्या बातम्या