पुणे : पुणे महापालिकेने दिलेल्या सवलतीमध्ये मिळकतकर भरण्याची सोमवारी अंतिम तारीख असल्याने अनेक नागरिकांनी ऑनलाइन मिळकतकर भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे महापालिकेच्या ‘सर्व्हर’वर ताण वाढल्याने मिळकतकर भरण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.

मुदतीत मिळकतकर भरता यावा, यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मिळकतकर भरणा केद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिकांना झालेला त्रास लक्षात घेऊन सवलतीमध्ये मिळकतकर भरण्यास महापालिकेने ७ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

नागरिकांनी मिळकतकर वेळेत भरावा, यासाठी ३० जूनपर्यंत मिळकतकराचा भरणा करणाऱ्यांना पाच ते दहा टक्के सवलत महापालिकेने जाहीर केली होती. ही मुदत संपत असल्याने सोमवारी मिळकतकर भरण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून प्रयत्न सुरू केले. अनेकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिकेच्या सर्व्हरवर ताण आल्याने अडचणी आल्या. त्यामुळे दोन ते अडीच तास प्रयत्न करूनही नागरिकांना पैसे भरता येत नव्हते. त्यामुळे महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांसह क्षेत्रीय कार्यालयात असलेल्या करभरणा केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली. या केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यानंतरही प्रत्यक्ष कर भरताना यंत्रणेवर ताण येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१२४५ कोटी रुपयांचा कर जमा

महापालिकेकडून मिळकतकरात १ मेपासून ३० जूनपर्यंत पाच ते दहा टक्के सवलत देण्यात आली. या काळात ७ लाख १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी सुमारे १२४५ कोटी रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये मिळकतकर विभागाला ३२५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे उद्दिष्टाच्या ५० टक्के उत्पन्न पहिल्या दोन महिन्यांतच जमा करण्यात मिळकतकर विभागाला यश आले आहे.

महापालिकेचा मिळकतकर भरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सवलतीमध्ये मिळकतकर भरण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ७ जुलैपर्यंत मिळकतकर भरता येणार आहे. ऑनलाइनसह महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात मिळकतकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.- अविनाश सकपाळ,उपायुक्त, मिळकतकर विभाग, पुणे महापालिका