पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या जामीन अर्जावर गुरुवारी (२४ जुलै) निर्णय होणार आहे.

अमृता फडणवीस यांच्याविषयी समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला होता. या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात निखिल जीवन संकपाळ (वय ३६, रा. कोथरूड, मूळ रा. कोल्हापूर), दत्ता तुकाराम चौधरी (वय ३७, रा. धाराशिव), बळिराम जयवंत पंडित ऊर्फ अमित पंडित (वय ४२, रा. भांडूप), आशिष दिगंबर वानखेडे (वय ३५, रा. अमरावती) आणि शैलेश नंदकिशोर वर्मा (वय ४७, रा. यवतमाळ) यांना अटक करण्यात आली. या पाच आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे भूषण दीनानाथ सावे (वय ३८, रा. नालासोपारा) आणि अभिजित किरण फडणीस (वय ४४, रा. वसई) या दोन आरोपींनी अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात अर्ज केला होता. याबाबत ॲड. बसवराज मल्लिकार्जुन यादवाड (वय ४७, रा. शनिवार पेठ) यांनी तक्रार दिली होती.

आरोपींच्या जामीन अर्जाबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी शिवाजीनगर सत्र न्यायालयाने अमृता फडणवीस यांना नोटीस बजावली होती. या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीत आरोपींना जामीन देण्यास सरकारी वकील राजेश कावेडिया, तसेच अमृता फडणवीस यांच्या वतीने ॲड. एस. के. जैन यांनी विरोध केला.

आरोपींनी समाजमाध्यमात लिहिलेला मजकूर आक्षेपार्ह असून, राजकीय हेतूने हा गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले मोबाइल संच, तसेच इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करायची आहेत. त्यामुळे आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकील कावेडिया यांनी केला. सरकार पक्षाच्या युक्तिवादानंतर याप्रकरणी गुरुवारी न्यायालय निर्णय देणार आहे,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजमाध्यमात राजकीय पक्षाचे नेते, त्यांचे कुटंबीय, तसेच निकटवर्तीयांवर टीका, बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणे गु्न्हा आहे, याची जाणीव अनेकांना नसते. बऱ्याचदा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करताना अश्लील भाषेचा वापर करतात. समाजमाध्यमात टीका करताना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भान बाळगावे, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.