राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा माजी उपाध्यक्ष शंतनू कुकडे याला एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्या तपासादरम्यान आरोपी शंतनू कुकडे आणि अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची माहितीसमोर आली. तर याप्रकरणी दीपक मानकर यांनी पोलिसांकडे सादर केलेले कागदपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसांपूर्वी दीपक मानकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणी दीपक मानकर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना, दीपक मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला आहे. आता यावर अजित पवार नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दीपक मानकर यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलंय ते पाहुया

आपल्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मी सन २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश केल्यानंतर पक्ष वाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी मी सदैव प्रामाणिक प्रयत्न केले. आपण मला विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. तेव्हापासून आजपर्यंत उपमहापौर, नगरसेवक, शहराध्यक्ष या विविध पदांची जबाबदारी देऊन मला सामाजिक व राजकीय काम करण्याची संधी दिली.

जुलै २०२३ मध्ये झालेल्या राजकीय बदलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे विभाजन झाले व आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी क्षणाचा न विचारता मी आपल्यासारख्या भक्कम नेतृत्वासमवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आपणही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत दिनांक ६ जुलै २०२३ रोजी मला राष्ट्रबादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. मला शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मी त्यावेळी पक्षाचे नाव व चिन्ह यांचा निर्णय होण्याअगोदर पक्षाला पाठींबा म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयात जी प्रतिज्ञापत्र द्यायची होती त्यामध्ये पुणे शहरातून मी सुमारे ९५०० प्रतिज्ञापत्र गोळा करून महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे जमा केले आहेत.

शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना महाराष्ट्रात नसेल इतकी मोठी जम्बो कार्यकारिणी करत फादर बॉडी, महिला, युवक, युवती, विद्यार्थी यांसह विविध सेलवर सुमारे १५०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून पक्षाचे व आपले काम करण्याची संधी देत पुणे शहरात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराअंतर्गत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य, साहित्य-कला, क्रीडा, वारकरी सांप्रदाय, क्षेत्रात २०० पेक्षा जास्त कार्यक्रम घेत तळागाळात लोकांपर्यंत पक्ष पोहोचवण्याचं काम केलं. तसेच माझ्या माध्यमातून पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुमारे १ लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सभासद नोंदणी पुस्तिकांचे आमदार, नगरसेवक, तसेच पदाधिकारी यांना वाटप करण्यात आलेले आहे. त्यातील अनेक सभासद नोंदणी पुस्तिका पक्ष कार्यालय येथे जमा झालेले आहेत. आपल्या आदेशाप्रमाणे तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या सुचनेनुसार आपला पक्ष व पक्षाची विचारधारा ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुणे शहरातील सर्व घटकातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवत असून नागरिकांच्या समस्या आजही सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

मात्र माझा वाढता राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे. मी काही वर्षांपूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता तीन ते चार दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. सदर गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणाऱ्या महानगपालिका निवडणूक तसेच माझी राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जर आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही. या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.

आदरणीय दादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कायम ठेवण्यासाठी मी अध्यक्ष झाल्यापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आलेलो आहे. तरी आपणास नम्र विनंती करतो की, माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र दीपक मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे. आता यावर अजित पवार काय निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे.