सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मॅरिएट या तारांकित हॉटेलच्या वाहनतळावर लावलेली तब्बल ८५ लाखांची मर्सिडिज बेंझ मोटार चोरीला गेली. मोटार चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मोटारचोर अखेर दिल्ली पोलिसांच्या हाती लागला. मात्र, मोटारचोराने चोरलेल्या पुण्यातील महागडय़ा मोटारी अद्याप पोलिसांना सापडल्या नाहीत. या मोटारी जप्त करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, चोरटय़ाने मोटारी कोणाला विकल्या याचा थांगपत्ता लागू दिला नाही..

बाणेर भागातील रहिवासी प्रीतम राजेश किनरा (वय ३७) या गेल्या वर्षी २९ जुलै २०१६ रोजी सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मॅरिएट या तारांकित हॉटेलमध्ये पतीसोबत गेल्या होत्या. प्रीतम या वास्तुविशारद आहेत. किनरा दाम्पत्य त्यांच्या मोटारीतून तारांकित हॉटेलमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास पोहोचले. हॉटेलमधील वाहनतळावर त्यांनी मोटार लावली आणि चावी सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये ठेवली. मोटारीत ठेवलेल्या बॅगेत किनरा यांनी लॅपटॉप ठेवला होता. तारांकित हॉटेलमध्ये शक्यतो मोटारी तेथील कर्मचारी वाहनतळावर नेतात. पतीसोबत रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भोजन करून बाहेर पडलेल्या प्रीतम केबिनपाशी गेल्या असता त्यांच्या मोटारीची चावी जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्या वाहनतळावर गेल्या. तेव्हा मोटार तेथे नसल्याचे निदर्शनास आले. हॉटेलपासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या जनवाडी पोलीस चौकीत त्यांनी तक्रार दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे धाव घेतली.

हॉटेलच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण त्यांनी तातडीने पडताळले. तेव्हा, टापटिपीत कपडे घातलेला तरूण किनारा दाम्पत्याची मोटार घेऊन हॉटेलच्या वाहनतळातून बाहेर पडल्याचे उघडकीस आले. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय शिंगाडे यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याने केलेले चित्रीकरण पडताळण्यास सुरूवात केली. तेव्हा किनारा यांची मोटार घेऊन पसार झालेला चोरटा पुणे विद्यापीठ, बाणेर रस्त्याने पुढे गेल्याचे आढळून आले. त्यानंतर लष्कर भागातील ब्ल्यु नाईल हॉटेल आणि शिवाजीनगर भागातील प्राईड हॉटेलच्या आवारातून महागडय़ा मोटारी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या.

पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीक रण पडताळले. तेव्हा मोटार चोरी करणारा आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले. चतु:श्रुंगी, शिवाजीनगर आणि बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने मोटार चोराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सराईत वाहनचोरटय़ांची चौकशी केली. चित्रीकरणात टिपलेल्या चोरटय़ाने टापटिपीत कपडे परिधान केले होते. त्यामुळे चोरटा परराज्यातील असावा, असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी परराज्यातील वाहनचोरटय़ांची माहिती घेतली. मात्र, तपास पुढे सरकत नव्हता. त्यानंतर १२ सप्टेंबर २०१६ रोजी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सत्येंद्रसिंग ईश्वरसिंग शेखावत (वय ३५,रा. जयपूर, राजस्थान) याला अटक करण्यात आली. शेखावतने दिल्लीतील एका तारांकित हॉटेलच्या आवारातून महागडी मोटार चोरली होती. दिल्ली पोलिसांच्या तपासात शेखावतने पुण्यात तीन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर तातडीने चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदेश केंजळे दिल्लीला रवाना झाले. शेखावतला पुण्यात आणण्यात आले. सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळलेला चोरटा शेखावत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात आली. पुण्यातून चोरलेल्या मोटारी कुठे आहेत, कोणाला विकल्या ? याबाबतची माहिती घेण्यात आली. शेखावतने राजस्थानातील हनुमानसिंग याचे नाव सांगितले. तो मला मोटारी चोरल्यानंतर महामार्गावर भेटतो. त्याला मोटार ताब्यात दिल्यानंतर तो पैसे देतो. पुण्यातून चोरलेली महागडी मर्सिडीज बेंझ त्याने दहा लाखांत हनुमानसिंग याला विकल्याची माहिती दिली. मात्र, त्याचा पत्ता दिला नाही. शेखावतने तपासात असहकार्य केले. पोलिसांना मोटार विकत घेणाऱ्या हनुमानसिंग याच्यापर्यंत पोहोचता आले नाही.

शेखावत याने अशा प्रकारचे गुन्हे मुंबईतही केले.  पुणे-मुंबईमधील तारांकित हॉटेलमधून चोरलेल्या मोटारी राजस्थानात विकत घेणारी टोळी सक्रि य आहे. राजस्थानातून या मोटारी नेपाळमध्ये विक्रीसाठी पाठवल्या जातात. या मोटारींचे पुढे काय होते, याचा माग पोलिसांना काढता आला नाही.  विशेष म्हणजे, एखाद्या गुन्ह्य़ात अटक केल्यानंतर शेखावत न्यायालयात वकील देत नाही. चोरीच्या गुन्ह्य़ात जास्तीत जास्त शिक्षा तीन वर्षांची आहे. ही शिक्षा भोगल्यानंतर शेखावत  पुन्हा मोटारचोरीचे गुन्हे करतो. चतु:श्रुंगी पोलिसांनी त्याला मोटारचोरीच्या गुन्ह्य़ात अटक केली. त्याच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले. मात्र, त्याने पुण्यातून चोरलेल्या तीन मोटारी कोणाला विकल्या, याचा थांगपत्ता लागू दिला नाही. आरोपीकडून चोरलेला ऐवज जप्त करणे हे पोलिसांचे कौशल्य मानले जाते. मात्र, मोटारचोर शेख याच्याकडून पोलिसांना महागडय़ा मोटारी जप्त करण्यात अपयश आले आहे किंबहूना त्याने मोटारी ज्यांना विकल्या त्यांच्यापर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही.