संजय जाधव

पुणे : करोना संकटानंतर आलिशान घरांना म्हणजेच दीड कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या घरांना दिवसेंदिवस मागणी वाढताना दिसत आहे. देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये यंदा तिसऱ्या तिमाहीत विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या घरांमध्ये आलिशान घरांचे प्रमाण २७ टक्क्यांवर पोहोचले. विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांत पुण्यातील आलिशान घरांच्या पुरवठ्यात तब्बल २४ पट वाढ झाली आहे.

देशातील प्रमुख सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा तिसऱ्या तिमाहीतील अहवाल अनारॉक ग्रुपने जाहीर केला आहे. त्यात दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता या महानगरांचा समावेश आहे. या अहवालानुसार, देशात सात महानगरांमध्ये तिसऱ्या तिमाहीत एकूण १ लाख १६ हजार २२० घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली. त्यातील ३१ हजार १८० म्हणजेच २७ टक्के घरे आलिशान आहेत. मागील पाच वर्षांतील ही उच्चांकी संख्या आहे.

आणखी वाचा-पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांनी मध्यवर्ती कार्यालयास दिली भेट

देशात २०१८ मधील तिसऱ्या तिमाहीत एकूण घरांच्या पुरवठ्यात आलिशान घरांचा वाटा ९ टक्के होता. त्यावेळी एकूण ५२ हजार १२० घरांचा पुरवठा झाला होता आणि त्यापैकी ४ हजार ५९० आलिशान घरे होती. यंदा तिसऱ्या तिमाहीत हैदराबादमध्ये सर्वाधिक १४ हजार ३४० घरांचा पुरवठा झाला आणि त्याखालोखाल मुंबई ७ हजार ८३० घरांचा पुरवठा झाला. एकूण आलिशान घरांमध्ये हैदराबादचा वाटा ४६ टक्के आणि मुंबईचा वाटा २५ टक्के आहे. पुण्यात २०१८ मध्ये तिसऱ्या तिमाहीत ८० आलिशान घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली होती. यंदा तिसऱ्या तिमाहीत ही संख्या १ हजार ९४० वर पोहोचली. मागील पाच वर्षांत त्यात २४ पटीने वाढ नोंदविण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना संकटानंतर ग्राहक मोठ्या घरांना पसंती देत आहेत. त्यातही प्रकल्पाचे चांगले ठिकाण आणि अत्याधुनिक सुविधा यांना महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे विकसकांकडून आलिशान घरांच्या बांधणीला प्राधान्य दिले जात आहे. -प्रशांत ठाकूर, विभागीय संचालक, अनारॉक ग्रुप

आलिशान घरांचा पुरवठा

शहर तिसरी तिमाही २०२३तिसरी तिमाही २०१८
दिल्ली ३८७० ९३०
मुंबई ७८३० २३८०
बंगळुरू १७१० २९०
पुणे १९४० ८०
हैदराबाद १४३४० २१०
चेन्नई ४६० ५८०
कोलकता१०३० १२०
एकूण ३११८० ४५९०