पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची उन्हाळी सत्राची परीक्षा सुरू झालेली असताना आता विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून पुन्हा ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी मंगळवारी करण्यात आली. त्यासाठी प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांना घेराव घालण्यात आला. मात्र डॉ. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून ऑफलाइन परीक्षेवर विद्यापीठ ठाम असल्याचे स्पष्ट केले.

करोना काळात विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या होत्या. तर करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा पारंपरिक पद्धतीने लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. विद्यापीठाच्या या निर्णयाला काही विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध करण्यात येत होता. पारंपरिक पद्धतीने परीक्षेचे नियोजन करताना प्रश्नसंच उपलब्ध करून देणे, परीक्षेदरम्यान सुटी देणे, अतिरिक्त वेळ देणे अशा सवलती देण्यात आल्या. त्यानुसार सोमवारपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्या. मात्र ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले.

अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, अध्यापन ऑनलाइन पद्धतीने झाले आहे, ऑफलाइन परीक्षेमुळे आमचे नुकसान होईल, विषय राहण्याची भीती आहे, असे सांगत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी केली. प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

ऑफलाइन परीक्षेसाठी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना सवलती दिल्या आहेत. त्यामुळे ऑफलाइन परीक्षेच्या नियोजनात आता कोणताही बदल होणार नाही. परीक्षा प्रक्रिया पूर्ण करून लवकर निकाल जाहीर करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी चर्चा केली. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यावर विद्यापीठ ठाम आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– डॉ. संजीव सोनावणे, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ