कुंभारवाडय़ाजवळील डेंगळे पुलाच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने सुरू केल्यामुळे या पुलावरून होणारी पीएमपी गाडय़ांची वाहतूक गुरुवार (२२ ऑक्टोबर) पासून बंद करण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या पुलावरून पीएमपीची वाहतूक बंद राहील.
डेंगळे पुलाच्या दुरवस्थेमुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी जड वाहतूक बंद करण्याचीही मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यानुसार पीएमपीची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका स्थानक ते स्टेशन या मार्गावरील गाडय़ा सध्या डेंगळे पुलावरून जातात. त्या गाडय़ा डेंगळे पुलावरून न जाता मनपा स्थानक, शासकीय धान्य गोदाम, कामगार पुतळा मार्गे गाडीतळ व पुढे नेहमीच्या रस्त्याने स्टेशनकडे जातील. तसेच स्टेशनकडून महापालिकेकडे येताना या गाडय़ा गाडीतळ येथे उजवीकडे वळून आरटीओमार्गे संचेती पुलावरून डावीकडे वळून अभियांत्रिकी महाविद्यालय वसतिगृह (स. गो. बर्वे चौक) ते डावीकडे वळून शिवाजी पुतळा, मंगला चित्रपटगृह मार्गे महापालिका भवन या मार्गाने जातील, असे पीएमपीतर्फे कळवण्यात आले आहे. कुंभारवाडा बस थांब्यावरून होणारे पीएमपी गाडय़ांचे संचालन बंद ठेवण्यात येणार असून या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी महापालिका स्थानक व गाडीतळ येथून प्रवास करावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.