ऊन, वारा, पाऊस.. पंढरीची खडतर वाट.. पण तुकोबारायांची संगत अन् विठोबाला भेटण्याच्या आर्त ओढीमुळे कशाचीही तमा न बाळगता अखंड भक्तिकल्लोळ करणाऱ्या लाखो वैष्णवांच्या साक्षीने शनिवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
दुष्काळाचे सावट दूर होऊन पाऊस सुरू झाल्याने चेहऱ्यावर आनंदाची लकेर घेऊन देहूत आलेल्या वारकऱ्यांमुळे नगरीत भक्तिचैतन्य साकारले होते. प्रस्थान सोहळ्यासाठी पहाटेपासूनच लगबग सुरू झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
पिता- पुत्रांची भेट.. संत तुकाराममहराजांचे धाकटे पुत्र व पालखी सोहळ्याचे जनक नारायणमहाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये तुकोबांच्या पादुका नेण्याची प्रथा यावर्षीपासून देहू संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आली. त्यामुळे पालखी प्रस्थानाच्या दिवशी पिता-पुत्रांची भेट झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. (छाया- राजेश स्टीफन)

परंपरेप्रमाणे काकड आरतीने सोहळ्याची सुरुवात झाली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये पहाटे साडेपाच वाजता महापूजा झाली. संस्थानचे अध्यक्ष रामदास महाराज मोरे या वेळी उपस्थित होते. नारायण महाराज समाधी मंदिरातील पूजेनंतर सकाळी नऊ वाजता संभाजी महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. ‘पहा ती गवळण, तव ती पालथी दुधानी’ या अभंगावर त्यांनी कीर्तन केले. त्यानंतर पाथ्रुडकर दिंडीने संत तुकारामांच्या पादुका इनामदार वाडय़ात आणल्या. तेथे पूजा झाल्यानंतर परंपरेनुसार म्हसलेकरांनी पादुका डोक्यावर घेतल्या व त्या मुख्य मंदिराच्या सभामंडपात आणल्या.
मुख्य मंदिरामध्ये सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार बाळा भेगडे, विलास लांडे यांच्या उपस्थितीत षोडशोपचार पूजा करण्यात आली. मंत्रघोषानंतर संस्थानच्या वतीने दिंडीकरी व मानकऱ्यांना नारळ प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी निघाली. प्रदक्षिणा पूर्ण करून मुख्य मंदिरातून पालखी इनामदार वाडय़ात मुक्कामासाठी पोहोचली. रविवारी पालखी देहूकरांचा निरोप घेऊन आकुर्डी मुक्कामासाठी मार्गस्थ होईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Departure of sant tukoba palkhi from dehu
First published on: 30-06-2013 at 03:00 IST