पुणे : ‘कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतील (सीएसआर) लोकसहभाग मोजण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘सीएसआर स्कोअर बोर्ड’ स्थापन करण्यात येईल,’ अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज सीएसआर पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात पवार यांनी ही घोषणा केली. प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी पवार यांच्या हस्ते १६ कंपन्यांना सन्मानित करण्यात आले.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी ‘सीएसआर’ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि उद्योग यांच्यातील त्रिसूत्री भागीदारी विकासाला गती देते. त्यासाठी एक खिडकी आणि तत्काळ परवानगीची हमी देण्याचे ठरवले आहे,’ असेही पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘जेवढा नफा कमावतो त्यातील काही नफा समाजाच्या भल्यासाठी वापरण्याची उद्योगपतींची इच्छा असते. यामध्ये सातत्याची अपेक्षा आहे. शासनाकडे पर्यावरणावर खर्च करण्यासाठी तीस हजार कोटी रुपये संकलित झालेले आहेत. पुणे जिल्ह्यासाठी एक मंच तयार केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिशय गुणवत्तापूर्ण आणि जलद आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदर्श आरोग्य केंद्राची योजना आहे.’
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी आभार मानले.