पुणे : शहरातील विविध कामांसाठी खोदण्यात आलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने निश्चित केलेली ७ जूनची मुदत पूर्ण झाल्यानंतरही रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. रस्ते पूर्ववत करण्यास महापालिकेचा पथ विभाग अपयशी ठरला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासह ड्रेनेज विभागाकडून अद्यापही अत्यावश्यक कामे करण्यासाठी रस्ते खोदाई केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

शहरातील रस्त्यांवर खोदाई केली जात असून, खोदलेले रस्ते पूर्ववत केले जात नाहीत त्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. आता पावसाला सुरुवात झाल्याने त्याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे. अर्धवट स्थितीत असलेल्या या कामामुळे वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. शहरातील रस्त्यांची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. ही कामे पूर्ण व्हावीत, यासाठी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पथ, ड्रेनेज तसेच विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, रस्ते पूर्ववत करण्यासाठीची मुदत संपल्यानंतरही अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्त करण्याचे काम रखडलेले आहे. बीएमसीसी महाविद्यालयासमोरील रस्ता, नवी पेठेतील गांजवे चौकात पत्रकार भवनासमोर, एरंडवणा येथील समर्थ पथ आणि इतर काही भागांत अद्यापही कामे सुरू आहेत.

दरम्यान, ११ जूनला एका दिवसात शहरातील १४९ खड्डे बुजविल्याचा दावा पथ विभागाने केला आहे. तर, ३२ चेंबरची दुरुस्ती, पाणी साचणाऱ्या ६ ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या. तसेच, १ एप्रिलपासून आतापर्यंत शहरातील १७९० खड्डे पथ विभागाने बुजविले असून, १८५ चेंबरची दुरुस्ती, पाणी साठणाऱ्या १२ ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्याचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील रस्त्यांची खोदाई तसेच रस्ते पूर्ववत करण्यासाठीच्या कामाची माहिती घेण्याासाठी सोमवारी (१६ जूनला) पथ, विद्युत तसेच ड्रेनेज विभाागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. यामध्ये कामांचा आढावा होणार आहे. ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त