पुणे : ‘आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी केवळ राजकारण सुरू आहे. सरकारी निर्णय हा ओबीसी समाजाच्या हक्क्कांवर गदा आणणारा नाही. एकाही अपात्र व्यक्तीचा ओबीसीत समावेश होणार नाही, अशा प्रकारची काळजी निर्णयात घेण्यात आली आहे. विजय वडेट्टीवारांसारख्या व्यक्तींना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. ओबीसींसाठीचे चांगले निर्णय आमच्या सरकारनेच घेतले आहेत,’ अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. या बाबत खुल्या चर्चेला तयार असल्याचे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.
‘सीओईपी’ तंत्रज्ञान विद्यापीठातील कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. फडणवीस म्हणाले, ‘आमच्या सरकारनेच २०१४ ते २०२५ या काळात ओबीसींसाठी सर्वाधिक निर्णय घेतले. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय, महाज्योती संस्थेची निर्मिती केली, विविध योजना लागू केल्या. ४२ वसतिगृहे बांधली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ओबीसींचे घालवलेले राजकीय आरक्षण पुन्हा आमच्याच सरकारने आणले आहे. या पूर्वी कोणत्याही सरकारने ओबीसींच्या हितासाठी आमच्या सरकारएवढे काम केले नाही. याबाबत आपण खुली चर्चा करण्यासाठी तयार आहोत. विरोधी पक्षातील लोकांना केवळ राजकारण करायचे आहे. मात्र, आम्हाला ओबीसी आणि मराठा समाजासोबतच सर्वच समाजांच्या हितांची काळजी आहे. सर्व समाजाच्या हिताची काळजी आमचेच सरकार करू शकते,’ असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाचे नेते वास्तविकता समोर आणणार नाहीत, तोपर्यंत तेढ कमी होणार नाही. समाजातील लोकांपर्यंत वास्तविकता पोहोचवली, तर सामाजिक तेढ कमी होईल. आमचे सरकार ही वास्तविकता लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहे,’ असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘प्राध्यापकांच्या ८० टक्के जागांवर पदभरती’
राज्यातील प्राध्यापक भरतीसंदर्भात फडणवीस म्हणाले, ‘राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी रिक्त पदांच्या ८० टक्के पदांवर प्राध्यापक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी राज्यपालांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यपालांनी काही बदल केले. या बदलांच्या प्रक्रियेत काही वेळ गेला आहे. मात्र, हे बदल पूर्ण झाले आहेत. त्यामुळे लवकरच रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरली जातील आणि उरलेल्या २० टक्के पदांनाही सरकारकडून लवकरच मान्यता मिळणार आहे. क्रमवारीतील शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तरासह काही बाबींमध्ये गुण कमी झाले आहेत. या अनुषंगाने राज्यातील कुलगुरूंशी चर्चा केली आहे. त्या बाबत लवकर सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जातील.’
‘डीजेमुक्ती’चीच भूमिका
‘डीजेमुक्त महाराष्ट्र हीच सरकारची भूमिका आहे. गणेशोत्सवात महानगरांमध्ये डीजे वाजविणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. काही ठिकाणी सरकारने डीजेंवर कारवाई केली आहे. सणांमध्ये किंवा उत्सवांमध्ये डीजे वाजवू नका, असे सांगत आहोत. या संपूर्ण प्रक्रियेत लोकांची जागृती करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. जागृतीमधील नागरिकांनी डीजे वाजवायचे सोडले, तर अधिक चांगले आणि अधिक टिकणारे आहे,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘पुण्यात टोळीयुद्ध नाही’
आंदेकर प्रकरणावरही फडणवीस यांनी भाष्य केले. ‘पुण्यात टोळीयुद्ध वगैरे काही नसून, त्यांचे आपापसांतील वैर आहे. हे वैरही आम्ही चालू देणार नाही. कोणीही डोके वर काढले तर, त्याचे डोके कसे खाली करायचे हे सरकारला ठाऊक आहे,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी पुण्यातील गुंडांना इशारा दिला आहे.